बद्रीनाथाचे दर्शन !
केदारनाथ धाम , तुंगनाथ महादेवमंदिर आणि चंद्रशिला शिखर असा प्रवास करत आम्ही उत्तराखंड राज्याच्या दोन धाम यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात पोहचलो होतो . आमचा शेवटचा टप्पा होता तो बद्रीनाथ धामचा !
आदल्या रात्री सर्वांनी मिळून बद्रीनाथ मंदिरात थेट न जाता आम्ही माणा गावात जाणायचे ठरवले . माणा हे उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यात बद्रीनाथ धामपासून अवघ्या ४ किलोमीटर अंतरावर असलेले एक अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक गाव आहे. हे गाव 'भारतातील पहिले गाव' म्हणून ओळखले जाते, कारण ते भारत-तिबेट (चीन) सीमेवरील शेवटचे मानवी वस्ती असलेले गाव आहे. माणा गाव हिमालयाच्या उंच पर्वतरांगांनी वेढलेले आहे, ज्यामुळे येथील नैसर्गिक सौंदर्य खूपच विस्मयकारक आहे. माणा गावातील घरांवर आणि सार्वजनिक ठिकाणी आढळणारी भित्ती चित्रे येथील स्थानिक कला आणि संस्कृतीचे उत्तम उदाहरण आहेत. बद्रीनाथ धाम आणि माणा गाव हे हिमालयाच्या सुंदर डोंगररांगांनी वेढलेले आहे. हिमालयाचे विशाल आणि उंच डोंगर पाहिले की माणूस पूर्णपणे थक्क होऊन जातो. त्याची भव्यता आणि अथांगता मनाला भारावून टाकते. आपण किती लहान आहोत याची जाणीवही या वेळी होते.
![]() |
बद्रीनाथ मंदिर , सायंकाळी ७ च्या सुमारास |
व्यास गुफा, गणेश गुफा, भीमपूल ,सरस्वती नदी आणि पांडवांच्या स्वर्गारोहणाचा मार्ग पाहून आम्ही माणा ते बद्रीनाथ मंदिर असा परतीचा प्रवास सुरु केला . प्रवासाच्या सातव्या दिवशीही सकाळी माणा गाव फिरताना पायपीट झाल्याने शरीर पार थकून गेले होते. आमच्या यात्रेचा कळस म्हणजे बद्रीनाथाचे दर्शन ! त्या साठी आम्ही उत्सुक होतो. पण मंदिराच्या जवळ आल्यावर आम्हाला दिसले की दर्शन रांग ४ किलोमीटर पेक्षा लांब आहे . त्या रांगेचे शेपूट शोधायलाच आम्हाला तासभर गेला. रांग शिस्तीची होती . रांगेत कधी शांत तर कधी खोडकरपणा करत आम्ही सर्वजण आपल्या आपल्या परीने एकमेकांना हसवत पुढे सरकत होते. गेले काही दिवस आमचा पूर्ण प्रवास हिमालयाच्या डोंगररांगात आणि हिमालयातील घाटांमध्ये चढाई उतराई करण्यात गेला होता . ट्रेकिंग, थकवणारे चढ उतार, अरुंद, वळणावळणाच्या वाटा आम्ही एकत्र पार करत इथवर पोहचलो होतो. ह्या पूर्ण प्रवासात एक संघ म्हणून आमच्यामध्ये एकमेकांबद्दलचा विश्वास आणि प्रेम वाढले होते. यात्रेत विलक्षण आणि अविस्मरणीय अनुभव आम्ही सर्वानी घेतले होते. येतील तो क्षण आनंदात जगात आम्ही इथवर पोहोचलो होतो . आज आमच्या यात्रेच्या अंतिम ध्येयाकडे आम्ही सर्व हळू हळू पुढे जात होतो. आमच्या सोबतीला अलकनंदा नदी वाहत होती . नदीचा खळखळणारा आवाज ऐकत हळू हळू मंदिराच्या मुख्य दरवाजाजवळ आम्ही ठेपलो.
अलकनंदा नदी आणि बद्रीनाथ मंदिर परिसर |
मंदिराचा बाह्य भाग आकर्षक आणि चमकदार रंगांनी रंगवलेला होता. विशेषतः पिवळा, लाल आणि निळा हे रंग आजूबाजूच्या हिरव्यागार निसर्गाच्या आणि बर्फाच्छादित शिखरांच्या पार्श्वभूमीवर उठून दिसत होते. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार भव्य आणि रंगीबेरंगी आहे, ज्याला सिंहद्वार असे म्हणतात. या प्रवेशद्वारातून आत प्रवेश करण्यासाठी रुंद पायऱ्या आहेत. सिंहद्वाराच्या शीर्षस्थानी तीन सोन्याचे कलश आणि मध्यभागी एक मोठी घंटा लटकलेली आहे. उंच उडी मारून पहिल्याच फटक्यात घंटा वाजवण्याचा आम्ही सर्वांनी प्रयत्न केला आणि अनेक जण त्यात यशस्वी पण झाले .
मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार |
पुढे आम्ही सर्व जण दर्शन मंडपाजवळ आलो. हा सभामंडपाच्या पुढे असलेला भाग आहे, जिथून भाविक देवाचे दर्शन घेतात. त्यावेळेस सर्वांचे दर्शन त्या मंडपातूनच येणार होते. मंडपासमोर आल्यावर दर्शनाची रांग अचानक पुजाऱ्यांनी थांबवली. ४ तासापेक्षा जास्त वेळ रांगेत उभे राहून आलो आणि देवाच्या दारातच रांग थांबली म्हणून आमचे मन थोडे धस्स झाले. मग एक विलक्षण प्रसंग घडला जो आजही मला आठवतो. अमरने खिशातून चंदनाचे अर्क असलेली कुपी काढली आणि सर्वांच्या हातावर लावायला सुरवात केली . अमर म्हणजे भारी अध्यामिक माणूस !
मी : चंदन का लावत आहे अचानक ?
अमर : चंदन विष्णू देवाला प्रिय आहे ! आणि बद्री विशाल हे विष्णूचे रूप आहे.मी : अरे मग २ वेळा चंदन लाव !रिचा : २ वेळा नको तू ४ वेळा चंदन लाव म्हणजे आपल्याला लवकर दर्शन मिळेल !असा संवाद चालू असताना पुजारी आला आणि म्हणाला , " सब यात्री बाये से आ जाये , सबका दर्शन गर्भगृह से होगा ! "
बस्स ! जणू चंदनाने आपले काम चोख केले होते. त्या क्षणी अमर म्हणजे आमच्या साठी देवाचा प्रेषित आहे असे वाटले होते . गर्भगृह हा मंदिराचा सर्वात पवित्र आणि मुख्य भाग असतो. आता आपल्याला भगवान बद्रीनारायण अजून जवळून पाहता येणार होते म्हणून आम्ही खुश होते. सुंदर नक्षीकाम केलेले ते विशाल कपाट (दार) उघडले गेले. " बद्री विशाल की जय ! " असा जयघोष करत आम्ही आत शिरलो आणि देवाचे मनापासून दर्शन घेतले. देवाच्या अस्तित्वाची जाणीव त्या वातावरणात होती . देवाला पाहून मन भारत नव्हते आणि पाय ही गर्भगृहातून हलत नव्हते. शेवटी आतून नीट दर्शन घेऊन आम्ही सर्व मंदिर परिसरात स्थिरावलो. मन शांत झाल्यासारखे वाटत होते . तेजस आणि श्रेयस ह्यांनी रामरक्षा पठण केले. रामरक्षा चालू असताना आज देव आपल्या सोबत आहे, असा विश्वास वाटत होता. मला तेव्हा उमगत होते की हे स्थान केवळ धार्मिक नसून, ते आध्यात्मिक शांती आणि निसर्गाच्या भव्यतेचे प्रतीक आहे.
ऐतिहासिक वृत्तांत असे सूचित करतात की हे मंदिर ५०० ईसापूर्व पासून अस्तित्वात होते. |
बद्रीनाथ धामबद्दलची माहिती :
१. बद्रीनाथ धाम हे हिंदू धर्मातील चार प्रमुख धामांपैकी एक आणि अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे.२. अलकनंदा नदीच्या काठी, समुद्रसपाटीपासून सुमारे ३,१३३ मीटर (१०,२७९ फूट) उंचीवर वसलेले बद्रीनाथ धाम हे भगवान विष्णूंना समर्पित आहे.३. बद्रीनाथ धाम साक्षात भगवान विष्णूचे निवासस्थान मानले जाते. मंदिरात भगवान विष्णूंची शाळीग्राम शिळेची मूर्ती योगासन मुद्रेत (पद्मासनात) विराजमान आहे. जगातील बहुतेक विष्णू मंदिरांमध्ये त्यांची उभी मूर्ती असते, परंतु बद्रीनाथमध्ये ते ध्यान मुद्रेत आहेत. याशिवाय, येथे कुबेर, नारद मुनी, उद्धव, नर आणि नारायण यांच्या मूर्तीही आहेत४. नर आणि नारायण नावाच्या दोन पर्वतरांगांच्या मधोमध वसलेले आहे. पौराणिक कथेनुसार, भगवान विष्णूंचेच अवतार असलेले नर आणि नारायण यांनी या ठिकाणी मानवतेच्या कल्याणासाठी अनेक हजारो वर्षे तपश्चर्या केली होती. यामुळे या स्थानाला 'नर-नारायण क्षेत्र' असेही म्हणतात.५. आदि शंकराचार्यांचे योगदान: आठव्या शतकात आदिगुरु शंकराचार्यांनी अलकनंदा नदीतून भगवान बद्रीनाथांची शाळीग्राम शिळेची मूर्ती शोधून काढली आणि ती सध्याच्या मंदिरात स्थापित केली, असे मानले जाते. त्यांनीच बद्रीनाथला चार धामांपैकी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून पुन्हा स्थापित केले.६. काही इतिहासकारांना असे वाटते की, हे मंदिर सुरुवातीला बौद्ध विहार होते, ज्याला नंतर आदि शंकराचार्यांनी हिंदू मंदिरात रूपांतरित केले.७. दरवर्षी केवळ सहा महिने (एप्रिलच्या शेवटी ते नोव्हेंबरच्या सुरुवातीपर्यंत) भाविकांसाठी खुले असते, कारण हिवाळ्यात येथे प्रचंड बर्फवृष्टी होते८. पंच बद्री: बद्रीनाथ हे केवळ एक धाम नाही, तर याव्यतिरिक्त पंच बद्री म्हणून ओळखले जाणारे आणखी चार बद्री मंदिरं आहेत, ज्यात योगध्यान बद्री, भविष्य बद्री, वृद्ध बद्री आणि आदि बद्री यांचा समावेश होतो.९. सध्याचे बद्रीनाथ मंदिर भव्य आणि आकर्षक आहे. मंदिराच्या सभामंडपावर डेरेदार कळस आणि गाभाऱ्यावर पॅगोडा पद्धतीचे सोन्याच्या पत्र्याने मढविलेले शिखर आहे.
सिंहद्वाराच्या मध्यभागी एक मोठी घंटा लटकलेली आहे. |
बद्रीनाथ धाम आणि केदारनाथ धामचा परस्पर संबंध :
पूर्वकाळात शिवभूमी: काही पौराणिक कथांनुसार, बद्रीनाथ हे स्थान पूर्वी भगवान शिव आणि देवी पार्वतीचे निवासस्थान होते. भगवान विष्णूंना हे स्थान खूप आवडल्याने त्यांनी बालकाचे रूप घेऊन या ठिकाणी रडायला सुरुवात केली. पार्वती मातेच्या विनंतीवरून भगवान शंकरांनी हे स्थान त्या बालकाला (जो प्रत्यक्षात विष्णू होते) दिले आणि स्वतः केदारनाथला निघून गेले.
सिंहद्वार |
बद्री वृक्षाशी संबंध:
एका पौराणिक कथेनुसार, भगवान विष्णू तपश्चर्या करत असताना, त्यांना तीव्र उष्णता आणि हिमवृष्टीपासून वाचवण्यासाठी देवी लक्ष्मीने 'बद्री' (बोरीचे झाड) चे रूप घेतले. लक्ष्मीच्या या भक्तीमुळे प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी या जागेला 'बद्रीनाथ' असे नाव दिले, म्हणजे "बद्री वृक्षाचे स्वामी". या भागात पूर्वी मोठ्या प्रमाणात बोरीची (बद्री) वने होती, त्यामुळेही हे नाव पडले असे मानले जाते.
अलकनंदा नदीवरील पूल |
धार्मिक महत्त्व:
- चार धाम पैकी एक: हे भारतातील चार प्रमुख धाम (बद्रीनाथ, रामेश्वरम, द्वारका, पुरी) पैकी एक आहे, ज्यामुळे यात्रेकरूंसाठी याचे खूप महत्त्व आहे.
- पिंडदान: बद्रीनाथ जवळील ब्रह्मकपाल हा एक पवित्र खडक आहे, जिथे पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पिंडदानाचे विधी केले जातात.
- तप्तकुंड: मंदिराजवळ गरम पाण्याचे झरे आहेत, ज्याला 'तप्तकुंड' म्हणतात. या थंड प्रदेशात या गरम पाण्यात स्नान करणे हे एक अद्भुत अनुभव असतो आणि ते पवित्र मानले जाते.
मंदिराचा बाह्य भाग आकर्षक आणि चमकदार रंगांनी रंगवलेला आहे |
कपाट उघडणे आणि बंद करणे:
बद्रीनाथ मंदिराचे कपाट सहसा एप्रिल-मे महिन्यात अक्षय्य तृतीयेच्या दिवशी उघडले जातात. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भाऊबीजेला थंडी आणि बर्फवृष्टीमुळे मंदिर बंद केले जाते. या काळात भगवान बद्रीनाथांची उत्सव मूर्ती जोशीमठ येथील नरसिंह मंदिरात आणली जाते, जिथे त्यांची पूजा केली जाते.नर-नारायण पर्वत ही दोन पर्वतांची जोडी आहे, जी उत्तराखंडमधील बद्रीनाथ येथे आहे.ही दोन पर्वते भगवान विष्णूचे दोन रूप मानली जातात |
बद्रीनाथला पोहोचण्याचे मार्ग :
बद्रीनाथला पोहोचण्यासाठी हरिद्वार किंवा ऋषिकेश हे मुख्य ठिकाणे आहेत. हरिद्वार आणि ऋषिकेश येथून बद्रीनाथसाठी बस आणि टॅक्सी सेवा उपलब्ध आहे. ऋषिकेश ते बद्रीनाथ हे अंतर सुमारे २९५ किमी आहे आणि प्रवासाला १०-१२ तास लागतात.वाटेत देवप्रयाग, रुद्रप्रयाग, कर्णप्रयाग आणि जोशीमठ यांसारख्या सुंदर ठिकाणांवरून प्रवास होतो. जोशीमठ हे बद्रीनाथपासून सुमारे ५० किमी अंतरावर आहे आणि येथून स्थानिक जीप किंवा टॅक्सीने बद्रीनाथला जाता येते.बद्रीनाथ धामला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ :
उन्हाळा ऋतू, किंवा मे ते जुलै महिने बद्रीनाथ मंदिराला भेट देण्यासाठी आदर्श काळ आहे. पावसाळ्यात भूस्खलन आणि रस्ते अडथळे येत असले तरी, तुम्ही बद्रीनाथ धामला भेट देऊ शकता.
मोक्षप्राप्ती:
अशी श्रद्धा आहे की बद्रीनाथचे दर्शन घेतल्याने भक्ताला जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो. म्हणूनच या जागेला "भूलोकावरील वैकुंठ" असेही म्हटले जाते. मंदिरातील एक विशेष गोष्ट म्हणजे येथील अखंड ज्योत. मंदिर सहा महिने बंद असतानाही हा दिवा सतत तेवत असतो असे मानले जाते. या दिव्यासाठी वापरले जाणारे तेल टिहरीच्या राजवाड्यातील महिला तयार करतात.
बद्रीनाथ मंदिरात शंख वाजवला जात नाही, यामागे काही पौराणिक कथा आणि मान्यता आहेत. एका कथेनुसार, भगवान विष्णूंनी एकदा शंखचूर्ण नावाच्या राक्षसाचा वध केला होता, ज्यामुळे येथे शंख वाजवला जात नाही.
पुजारी (रावल):
मंदिराचे मुख्य पुजारी दक्षिण भारतातील केरळमधील नंबूदिरी ब्राह्मण वंशाचे असतात, ज्यांना "रावल" असे संबोधले जाते. ही परंपरा आदि शंकराचार्यांनी सुरू केली असे मानले जाते.
पाऊल ट्रेकर्स |
नीम करोली बाबा कुटीया |
हे मंदिर समुद्रसपाटीपासून सुमारे ३,१३३ मीटर (१०,२७९ फूट) उंचीवर आहे.
माना गावातील भित्तीचित्रांची शैली, इतर ठिकाणांपेक्षा वेगळी आहे. ती, त्या भागातील स्थानिक कलाकारांनी विकसित केलेली आहे. |
Very Nice & informative
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद ! 😀
Deleteखूप छान नरेंद्र 👍🏻 पुन्हा एकदा बाबा बद्रीनाथाचे दर्शन घेतल्याचा प्रत्यय आला. अमर ने आपल्या सर्वांना चंदनाचे अत्तर लावल्या नंतर आपल्याला आलेली अनुभूती शब्दात मांडता येणार नाही. केदारनाथ तुंगनाथाचे अवरणीय ट्रेक करून आपली गाडी बद्रीनाथ कडे वळली सतत प्रवास करून आलेला थकवा आणि ४ तास रांगेत उभे राहून सुद्धा बाबा बद्रिनाथाचे दर्शन झाल्यावर सर्व थकवा जणू नाहीसा झाला. माणा गावातील चित्रमय प्रवास देखील सुंदर होता. लवकरच पाऊल ट्रेकर्स पंच केदार चा प्लॅन करतील आणि पुन्हा एकदा देवभूमी उत्तराखंड मधे जाण्याचा योग येईल अशी आशा बाळगतो.
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद ! नाक्कीच आपण जाऊ आणि खूप ट्रेक एकत्र करू ! तुझ्या सोबत असल्याने खूप छान वाटले आणि हा प्रवास खूप आठवणीत राहिल्या सारखा झाला
ReplyDeleteखुप सुंदर
ReplyDeleteखूप धन्यवाद आणि आभार ! 😀
Deleteअतिशय सुंदर वर्णन आहे. साक्षात तिथे असल्या सारखे वाटत होते.. मुळात सर्व छायाचित्र खूप छान टिपली आहेत.. पुढे ही असेच लिहित राहा.. खूप शुभेच्छा
ReplyDeleteखूप धन्यवाद आणि आभार ! 😀
DeleteWow Amazing 👌👌
ReplyDeleteखूप धन्यवाद आणि आभार ! 😀
Deleteखूपच छान वर्णन आहे.
ReplyDeleteखूप धन्यवाद आणि आभार ! 😀
Delete'कपाट उघडणे-बंद करणे ' शब्द प्रयोग आवडला. छान लेखन- ईला
ReplyDelete