Wednesday, July 31, 2019

सुधागड ! SUDHAGAD FORT

सुधागड ! 

सुधागड ह्या किल्ल्याला खूप ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्व आहे . ह्या किल्ल्याचे नाते पार भृगु ऋषींपर्यंत जोडले गेले आहे. पुराणात भृगु ऋषींनी येथे वास्तव्य केल्याचे उल्लेख आढळतात अशी माहिती गडाबद्दल सांगितली जाते. तप: साधना करून भृगु ऋषींनी भोराई देवीची स्थापना या डोंगरावर केली. पूर्वी या गडाला भोरपगड असेही म्हणत असत. भोर संस्थानातील सर्वात महत्वाचा किल्ला म्हणून भोरपगड ओळखला जाई . भोराई देवी ही भोर संस्थानाची  कुलदेवता आहे .  श्री शिव छत्रपती महाराज ह्यांच्या पदस्पर्शाने पावन झाल्याने या गडाला सुधागड हे नाव पडले. रायगडासोबत सुधागड हा  स्वराज्याच्या राजधानीच्या शर्यतीत होता . या वरूनच हा किल्ला किती महत्वाचा आहे हे समजले असेल. सवाष्णीच्या घाटाचा पहारेकरी म्हणून सुधागडची ओळख होती . पुण्यातून कोकणात उतरण्यासाठी सवाष्णीच्या घाटाचा उपयोग होत असे.   इ.स.पू. दुसऱ्या शतकात  सुधागड परिसरातील  ठाणाळे आणि खड्सांबळे ह्या बौद्ध लेण्यांची निर्मिती झाली आहे . ह्या संदर्भावरून सुधागड हा किल्ला ही खूप प्राचीन असावा असा अंदाज आहे . आता  ट्रेक क्षितिज संस्थेने  सुधागड किल्ल्याचे पालकत्व घेतले आहे . ही संस्था येथे किल्ले संवर्धन आणि जपणुकीचे कार्य करते . शेवटी किल्ल्याचा  खूप चांगला इतिहास देत आहे . नक्की वाचावा.


महादरवाजा / दिंडी दरवाजा 

पाऊल ट्रेकर्सचा ७ वा वाढदिवस आणि त्यानिमित्त बनवलेले बॅच 

धुके दाटलेले 

सुधागडच्या आठवणी २०१२  : 

२०१२ साली मी नुकतीच ट्रेकिंगला सुरुवात केली होती. मी इतका नवीन होतो की शर्ट आणि जीन्सवरच गडकिल्ले  फिरायचो.  बाईक राईड करून नाईट ट्रेकचा माझा तो पहिला अनुभव होता . गुलाबी थंडी मध्ये बाईक सफारी ... रात्री लखलखत्या चांदण्यांच्या प्रकाशात  हरवणे आणि मग वाट काढत सुधागडच्या पंत सचिवांच्या वाडयात पोहोचणे ह्याचा आनंदच वेगळा  होता . दूर नजर जाईल तेवढे पठार ...कोरीव महादरवाजा...भोराई देवीचे मंदिर...शंकराचे मंदिर...पंत सचिवांचा वाडा ...तैल बैला आणि घनगडचा डोंगर परिसर...पिण्याच्या पाण्याची टाकी....तलाव ... धान्यकोठार  ...बुरुज आणि त्यामधील भुयार अशी सुधागडची संपत्ती  डोळ्यात भरून राहिली होती . पावसाळी ट्रेक मध्ये त्यांचे रूप कसे असेल ह्याची कल्पना मी ट्रेक पूर्वी करत होतो . ठाकूरवाडी कढून येणाऱ्या पहिल्या  बुरुजाच्या भुयारातील मार्गाचा अविस्मरणीय अनुभव आणि गडावरील शेणाने सारवलेल्या वाड्यातील पहाटे पहाटे लागलेली झोप कधी संपू नये अशी होती  ! सकाळी चूल पेटवून न्याहारीला गरमागरम चहा आणि "मॅगी "....मग गडावरील सुंदर ठिकाणांची भटकंती ......बुरुजामधील थंड हवेतील दुपारी जेवलेल्या दशम्या आणि फराळ ...संध्याकाळी नदीमधील अंघोळीची धमाल..... असे सर्व काही आठवत होते . दिवस - महिने - वर्ष भर भर निघत आहेत ह्याची जाणीव पटकन होत होती. तेव्हा दशरथ - अंबर ह्यांची नव्याने ओळख झाली होती.  हा हा  म्हणता धवल - अभिनव - वैशाली - रमाकांत - श्रेयस  ह्यांच्याशी आज  ७ वर्षाची मैत्री पूर्ण झाली. ह्या सवंगड्यांसोबत अनेक किल्ल्यांना भेटी देता आल्या आणि आयुष्यात सुखवस्तू राहण्यासाठी मला काय करायचे आहे हे नव्याने उमगले .

सन २०१२ - सुधागड - वैशाली - नरेंद्र - अभिनव - धवल - दशरथ - रमाकांत (सर्व उभे) , पराग - अंबर (बसलेले ) 
सन  २०१२ - दिंडी दरवाजाजवरील  शरभ शिल्प 

सन  २०१२ - अभ्यास 


२०१९ पाऊलचा वाढदिवस आणि ट्रेक बंदीचे सावट  ! 

१५ जुलै २०१२ हा पाऊल ट्रेकर्सचा पहिला वाढदिवस ! २०१२ पासून पाऊलच्या वाढदिवसा दिवशी किंवा त्याचा पुढचा मागचा रविवार पकडून सक्तीने ट्रेकला जायचे आणि पाऊलचा वाढदिवस साजरा करायचा असा आमचा वार्षिक कार्यक्रम हा जवळपास ठरलेलाच असतो. आता पावसाने जोरदार हजेरी लावली होती. पण आपण ट्रेक करायचा कुठे ह्यात संभ्रम होता . गणपती गडद , अंजनेरी , अंधारबन असे खूप पर्याय होते . पण सरकार आणि वनखात्याने  ठाणे  आणि पुणे परिसरातील मुख्य किल्ले आणि धबधब्यांच्या ठिकाणी  थेट ऑगस्ट शेवटापर्यंत जमावबंदी आणली. " ही,  बंदी कुणा मुळे  रे भाऊ ? .. तर ही  बंदी आली  ती बेशिस्त  आणि इतिहासापेक्षा पैश्यांची लालसा असणाऱ्या " पावसाळी बेडकांना " ट्रेकला नेणाऱ्या संस्थेंमुळे !  " पावसाळी बेडूक " ही  संज्ञा ह्या वर्षी  खूपच प्रसिद्ध झाली.  शेकडो सभासदांचा भरणा करून फक्त पावसाळ्यातच गड  किल्ल्यांवर  फिरायचे आणि शिस्त न बाळगता ऐतिहासिक स्थळांवर गर्दी करायची ह्या कुप्रवृत्तीचा विपर्यास म्हणजे ही बंदी आहे हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही . सध्या सुरक्षितता न बाळगता आणि अपूर्ण माहिती गाठीशी ठेवून अनेक संस्था लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत लोकांना "ट्रेक" ह्या आकर्षक नावाखाली गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांवर नेतात. बेशिस्त आणि वाईट नियोजनामुळे काही दुदैवी क्षणी  दुखापती  आणि अपघात होतात. अश्या बातम्या वणव्यासारख्या पसरतात आणि सरकारतर्फे जमावबंदी सुरु होते . अश्या वेळी ओल्याबरोबर सुके जळते त्या प्रमाणे सच्च्या प्रामाणिक ट्रेकर्सलाही अश्या बंदीचा सामना करावा लागतो. अश्या वातावरणात खूप विचारांनी सर्व जणांना घेऊन आम्ही सुधागड किल्ल्यावर जायचे ठरवले. ह्या वेळी संख्या थोडी जास्त होती पण शिस्त ठेवून, निसर्गाचा आणि  किल्ल्याचा मान  राखून आपण ट्रेक करायची असे आम्ही ठरवले. 

💓💓 निरागस हास्य 💓💓 ट्रेक सुरु करण्यापूर्वी काढलेला फोटो 


शिडीची वाट 

ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा
माझ्या मनातला का तेथे असेल रावा

चिलखती बुरुजाकडे जाणाऱ्या पायऱ्या 

डोंबिवली ते सुधागड : 

श्री शिवछत्रपती महाराज चौक, डोंबिवली येथून आम्ही सुधागडला निघणार होतो. एकूण ४० जण असल्याने ४० व्यक्तींची क्षमता असणारे एक खाजगी वाहन सचिनने आरक्षित केले होते . ठरल्या प्रमाणे सर्व जण वेळेत आले आणि मध्य रात्री १२ च्या सुमारास आम्ही निघालो . पहिला पावसाळी ट्रेक असल्याने खूप धमाल असणार असे समजूनच सर्व खूप उत्साही होते. पाऊलचा वाढदिवस म्हणून सर्वांना  स्पेशल मावा केक  दिला होता . कुणीही झोपण्याच्या मनःस्थिती मध्ये नव्हते.  काही जण गाणी म्हणत तर काही जण डान्स करत धमाल करत होती. रोजच्या जीवनात आपल्याला कधी प्रवासाचा फारसा आनंद घेता येत नाही . ट्रेकला जाताना किंवा येताना थोडी धमाल मस्ती करता येते आणि ती नेहमी संस्मरणीय असते. सकाळी लवकर ट्रेक सुरु करायचा  आहे आणि आपल्या शरीराला आरामाची गरज आहे ह्या गोष्टीचा कुणालाही विचार नसतो.  धमाल करत ट्रेकला जाणे ही मनाला उत्साही ठेवायची एक उपचार पद्धती असते असेच मला वाटते. रात्री ३ च्या सुमारास एका नाक्यावर चहा घेण्यासाठी थांबलो. गाडी पुन्हा सुरु झाली . इथून मात्र थोडी झोप गाडी मध्ये सर्वांनी काढली आणि जाग आली  ते थेट पाच्छापूर गावी ! सकाळी ५ वाजले होते .  श्रेयसने सकाळच्या नाश्त्यासाठी एका घरी सांगून ठेवले होते. मस्त कांदा पोहे आणि चहा घेऊन सर्वांची सुस्ती उडाली. तिथून पुढेच ठाकूरवाडी गावी आम्ही पोहोचलो . पूर्ण सुधागडचा  माथा धुक्यात लपलेला होता.  सर्वत्र हिरवळ होती आणि शेतात पिकांची लागवड झाली होती . सह्याद्रीच्या कुशीतील हे गाव पावसाच्या आगमनाने हिरवेगार झाले होते. ट्रेक सुरु करण्यापूर्वी पाऊलच्या वाढदिवसासाठी खास बनवलेले बॅच विग्नेशाने सर्वांना वाटले . ट्रेक लीडर धवलने ट्रेक बद्दलचे नियम सांगितले आणि नेहमी प्रमाणे सर्वांची ओळख करून सकाळी ७ वाजता ट्रेक सुरु केली.


उप बुरुजाकडे जाणारा रस्ता 

उप बुरुजाकडे जाणारा रस्ता

उप बुरुजाकडे जाणारा रस्ता

सुधागडकडे वाटचाल ! 

सुधागड किल्ल्यावर जाण्यासाठी २ मार्ग आहेत .
१. धोंडसे गावातून - या मार्गावरून गडावर येण्यासाठी अंदाजे ३ तास लागतात. पाली पासून धोंडसे या गावी यावे लागते. तैलबैला जवळून उतरणारा सवाष्णीचा घाट हा आपल्याला याच मार्गावर घेऊन येतो. येथून आपण गडाच्या गोमुखी पद्धतीच्या महादरवाजातून प्रवेश करतो. या वेळी आम्ही ह्या मार्गाने  न जाता ठाकूरवाडी मार्गाने गेलो .  पुढील हिवाळी ट्रेक कदाचित ह्या मार्गाने करू असा मानस आहे.
२. ठाकूरवाडी गावातून -  पाली - पाच्छापूर - ठाकूरवाडी असा आपल्याला प्रवास करावा लागतो . ठाकूरवाडी गावातून २ ते २.५ तासामध्ये आपल्याला गडमाथ्यावर जाता येते . हा मार्ग ट्रेकर्स साठी सोपा असून ह्या मार्गावर २ लोखंडी शिड्या आहेत . ह्या शिड्या कठीण जागांवर बसवल्या आहेत म्हणून गडावर जाणे खूप सुरक्षित झाले आहे.  ह्या शिड्यांमूळे अवघड ठिकाणी चढणे सोपे आणि सुरक्षित झाले आहे .

सकाळी वातावरण खूप प्रसन्न होते.  एका प्राथमिक शाळेसमोरून आणि एका शेताच्या बाजूने एक वाट वर जाते. ती वाट पकडून आम्ही वर जाऊ लागतो. कधी धुके दाटून येत होते तर कधी धुके सरून ठाकूरवाडी गाव दिसत होते . पावसाची लक्षणे फार नव्हती . आम्ही सर्वच पावसाची वाट पाहत होतो. पण पावलोपावली पावसाची चिन्ह नव्हती. एका पाठोपाठ एक आम्ही चालत होतो . अनिकेत सर्वात शेवटी तर सचिन सर्वात पुढे ! या दोघा शिलेदारांमध्ये आम्ही जमेल तसे चालत होतो. शिड्या आल्यावर फोटो काढत  तर कधी अवघड चढण चढल्यावर विश्रांती घेत आम्ही कधी चिलखती बुरुजाजवळ पोहोचलो ते समजले नाही. गड चढाईस खूप सोपा असल्याने कुणालाही त्रास झाला नाही. माझ्यासोबत वेदांत आणि आदिश आले होते . त्यांचा पहिलाच ट्रेक होता. ते ही सर्वांसोबत आरामात चालत होते. मी पण निश्चिन्त होतो . रस्ता ओळखीचा होता. काही नवीन सवंगडीं सोबत नवीन अनुभव गुंफत मी चालत होतो . निवांत !

पूर्ण सुधागडचा  माथा धुक्यात लपलेला होता


चिलखती बुरुज 


पाऊल ट्रेकर्स 

 बुरुज आणि सुधागडचा गडमाथा :

गडावर खालील प्रमाणे बुरुज आहेत 
१. चिलखती बुरुज क्रमांक - १ (ठाकूरवाडी दिशेकडील) 
२. चिलखती बुरुज क्रमांक - १ (पूर्वेकडील ) 
३. बोकडशील पहारा बुरुज 
४. ओंबळे बुरुज 

पुढे लोखंडी रेलिंग असलेल्या ह्या पायऱ्या आपल्याला ठाकूरवाडी बाजूच्या बुरुजाजवळ नेतात. ताशीव कडा असलेल्या ह्या बुरुजाला एक चोर दरवाजा आहे जो उतरून एक उपबुरुजावर जातो. उपबुरुजावर जाताना जी चोर वाट आहे ती पहिल्यावेळी खूप थरारक वाटली होती. तेव्हा रात्रीची वेळ होती आणि वटवाघळे आणि काळ्याकुट्ट मोठ्या पाली ह्या वाटेवर होत्या. थोडा जीव मुठीत ठेवून आम्ही कसे बसे चोरवाटेतून निघालो होतो. चोर वाटे नंतर प्रचंड फोटोग्राफी करून आम्ही  गडमाथ्यावर निघालो . खूप फोटोग्राफीचा प्रसाद आम्हाला लवकरच पंत सचिवांच्या वाड्यात मिळणार होता . पण आम्ही या बद्दल अनभिज्ञ होतो. पुढील १५ मिनिटात  एका विस्तीर्ण पठारावर आम्ही सर्व जण विसावलो . दूर नजर जाईल तिथपर्यंत हिरवळ होती. पडक्या वाड्यांचे जोथे दिसत होते . बा रायगड परिवाराने जागोजागी दिशादर्शक फलक लावले होते. जागोजागी दगडांवर मार्किंग ही  केली असल्याने येथे हरवण्याची शक्यता कमी आहे . कमळ तलाव आणि सिद्धेश्वर मंदिर पाहून आम्ही पाण्याच्या टाक्यांच्या इथे जाण्याचे ठरवले.  कमळ तलावात पावसाळ्यात एकही कमळ नव्हते. पण हिवाळ्यात कासच्या कुमुदिनी तलावासारखी कमळे येथे दिसतात. 


पाऊल ट्रेकर्स 

कमळ तळे , सिद्धेश्वर महादेव मंदिर 






गड गणपती 


पाण्याच्या टाक्या आणि सर्प दर्शन : 

पंत सचिवांच्या वाड्या अगोदर एक उतार  उतरल्यावर २ पाण्याच्या टाक्या लागतात . ह्या टाक्या आकाराने मोठ्या असून या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. जाता जाता एका साप अचानक सपसप करत समोरून निघून गेला. तो कुठे जात आहे ह्याचा मागोवा काढता  काढता  तो अदृश्य झाला. सर्प दर्शन हे नेहमीच चांगले ठरले आहे. त्यामुळे मी खूप खुशीत होतो. सर्वांनी आपल्या पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या आणि पंत सचिवांच्या वाड्यात जाण्यास तयार झाले . गडावर खूप काही पाहण्यासारखे आहे . अजून आम्ही निम्मा पल्लाही गाठला नसल्याने सर्वांनी लगबग केली.

पाण्याचे टाके क्रमांक १ 

पाण्याचे टाके क्रमांक २ 

पंत सचिवांचा वाडा : 

सुधागड वरील ट्रेकर्सचे मुक्कामाचे ठिकाण म्हणजे पंत सचिवांचा सरकारवाडा होय .मध्यवर्ती अंगण असून  वाडा चौकोनी आहे. काही भग्न अवशेष वाड्यात आपणास पाहायला मिळतात . एका कोपऱ्यात स्वयंपाक करता येतो. भोराई देवी मंदीरातील पुजारी खंडागळे आणि त्यांच्या पत्नी ह्या कोपऱ्यात ट्रेकर्ससाठी जेवण आणि चहाची व्यवस्था करतात. अगदी माफक दारात जेवण आणि चहा येथे विनंती केल्यास मिळतो. वाडा शेणानी सारवलेला असून विश्रांती आणि मुक्कामासाठी ही  योग्य आहे . महादरवाजाला जाण्या अगोदर सर्वांनी यथे विश्रांती घ्यावी असे ठरले .  सर्वांनी चहा घेऊन आपआपल्या डब्यातील जेवण फस्त  केले . नेहमी प्रमाणे सर्वांनी इतके जेवण आणले होते की  काही जणांना जेवण घरी घेऊन जावे लागले. महेशचा ठेचा मात्र सर्वात आधी संपला.  सर्वांचे सहभोजन झाल्यांनतर थोडी विश्रांती घेतली आणि त्या नंतर धवलने गडाबद्दल माहिती सांगितली. ट्रेकरने ट्रेक कसा करावा आणि कुठे फोटो काढावे आणि कुठे जास्त लक्ष द्यावे याबद्दलचे मार्गदर्शन धवलने सर्वांना  केले. त्याने सांगितलेल्या सर्वच गोष्टी आचरणात आणण्यासारख्या आहेत हे आम्हाला कळले . फोटो काढण्याच्या मोहापायी गड पाहणे अर्धवट राहू नये हा आपला उद्देश असला पाहिजे हे नक्की !
खाली वाड्याचा इतिहास देत आहे. अगदी महत्वाचा इतिहास जसाच्या तसा ट्रेक क्षितिज संस्थेच्या माहितीपटावरून साभार घेतला आहे .

पंत सचिवांचा वाडा

काही भग्न अवशेष वाड्यात आपणास पाहायला मिळतात


वाड्याचा इतिहास - 

१. पंत सचिव हे पद मूलतः "सुरनीस" म्हणून ओळखले जायचे. सुरनीस हा शब्द फारसी असून त्याचा अर्थ छत्रपतींनी दिलेल्या सनदा, वराती, हुकुमनामे यावर 'सुर सुद बार' असे शेरे मारणारा. व्यापक राज्यव्यवस्थेत या कामाच्या प्रमुखासच सुरनीस असे म्हणू लागले. राज्याभिषेकाच्या वेळी, पंत सचिव असे नाव देऊन त्या पदावर अण्णाजी दत्तो यांची नेमणूक केली. पंत सचिवांना वर्षाल पाच हजार होन असा पगार असे.
२. छत्रपती संभाजी महाराजांनी गादीवर आल्यावर त्यांच्या विरुद्ध कट कारस्थाने केली म्हणून अण्णाजींना  प्रथम सचिवपद काढून कैदेत बसवले, परंतु नंतर मुक्त करून त्यांची पुन्हा सचिवपदी नेमणूक झाली.
३. त्यानंतर रामचंद्र नीलकंठ हे पंत सचिव झाले.
४. छत्रपती राजाराम महाराजांनी भोरप्या गडावरील सबनीस नरो मुकुंद यांच्या मुलाला, शंकरजी नारायण याला पंत सचिव केले. शंकरजी नारायण याने पुढील काळात अतुलनीय पराक्रम करून मोगली सैन्यापासून राज्याचा बचाव केला. इ.स. १७१४ च्या सुमारास छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना सचिव पद वंशपरंपरेने दिले. त्यानंतर त्यांचे वंशज परंपरेने त्या पदावर बसत होते.
५. इंग्रजी अमदानीत पंत सचिवांना संस्थानिक म्हणून मान्यता मिळाली. भोर संस्थानाचे ते राजे झाले. आजही भोर मध्ये पंत सचिवांचे घराणे चालू आहे.
६. महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात असलेल्यांपैकी अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, त्याचा मुलगा आवजी बल्लाळ, आणि हिरोजी फर्जंद या सर्वांना भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी छत्रपती संभाजी राजांनी सुधागड परिसरात असणार्‍या परली गावात हत्तीच्या पायी दिले.

धवल गडाचा इतिहास सांगताना 

गडाचा नकाशा 

भोराई देवी मंदिर - वीरगळ 

वाड्यापासून जवळच भोराई देवीचे मंदीर आहे . मंदीर मोठे आणि सुस्थितीत आहे . मंदीरात एक व्याघ्रमुर्ती आहे आणि सभामंडपात एक भली मोठी घंटा देखील आहे. देवीची मूर्ती खूप सुंदर असून तिच्या दर्शनासाठी अनेक भाविक येत असतात. मंदिराच्या आवारात एक दिपमाळ आहे . दिपमाळेत हत्ती कोरला आहे. दिपमाळेच्या सर्व भर त्या हत्तीने उचलला आहे असे आपल्याला वाटते .  मंदिराच्या आवारात जवळ जवळ ३६ वीरगळी आहेत.वीरगळ म्हणजे वीर पुरुषांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेला (सहसा - दगडांचा अथवा लाकडाचा) स्तंभ असतो. यास वीरस्तंभ असेही म्हणतात. महाराष्ट्रात जुन्या देवळांच्या बाहेर वीरगळ आढळतात.  भोराई देवीच्या मंदिराच्या मागील बाजूस अनेक समाध्या आहेत. त्यांवर सुबक नक्षीकाम आहे. 




मंदिरातील व्याघ्रशिल्प 

तैलबैला - घनगड आणि परिसर : 

आम्ही भोराई देवीच्या मंदिर परिसरात वीरगळी पाहताना मग्न होतो आणि अचानक धुके सरून उन्ह पडले.  आम्ही धावत भोराई देवीच्या समोरील पठारावर पळत गेलो . समोर सुंदर तैलबैला आणि घनगड दिसत होते. आम्ही कोकणात तर समोर दिसत असलेला  तैलबैला आणि घनगड घाटावर अश्या भौगोलिक रचनेवर आम्ही उभे होतो . मध्ये फक्त विशाल खोरे होते. सह्याद्रीची रचना ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बाहेर आलेल्या लाव्हा रसामुळे झालेली आहे. या लाव्हरसाचे थर थंड होतांना अनेक वैशिष्ट्यपूर्ण रचना तयार होतात. त्यापैकी एक रचना म्हणजे "डाईक" तैलबैला उर्फ कावडीचा डोंगर हे अशा रचनेचे एक उत्तम उदाहरण आहे. डाईक म्हणजे लाव्हारसाच्या विशिष्ट प्रकारे साठण्यामुळे व थंड होण्यामुळे बेसॉल्ट खडकाची तयार झालेली भिंत. तैलबैलाचा डोंगर हा अशाच प्रकारच्या दोन कातळभिंतीमुळे लक्ष वेधून घेतो.प्राचीन काळापासून कोकणातल्या बंदरांमध्ये उतरणारा माल घाटावरील बाजारपेठांमध्ये आणला जात असे. या मार्गांचे रक्षण करण्यासाठी बंदरापासून बाजारपेठे पर्यंत किल्ल्यांची साखळी बनवलेली असे. त्यातील एक म्हणजे "वाघजाई घाट ". या घाटावर लक्ष ठेवण्यासाठी तैलबैलाचा उपयोग करण्यात येत असावा. तैलबैला ते ठाणाळे लेणी हा प्राचीन घाटमार्ग आजही वापरात आहे. तैलबैला वरून नैऋत्येस सुधागड, आग्नेयेस घनगड आणि ईशान्येस कोरीगड नजरेस पडतात. मुळशी धरणाच्या पश्चिमेला असलेल्या मावळाला ‘कोरसबारस’ मावळ म्हणतात. याच मावळात येणारा हा घनगड हा आड बाजूला असलेला छोटेखानी किल्ला आहे. पाली - सरसगड - सुधागड - सवाष्णीचा घाट - घनगड - तैलबैला - कोरीगड असा प्राचीन मार्ग होता . 





वीरगळ म्हणजे वीर पुरुषांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेला (सहसा - दगडांचा अथवा लाकडाचा) स्तंभ असतो.
यास वीरस्तंभ असेही म्हणतात.

दिपमाळेत हत्ती कोरला आहे. दिपमाळेच्या सर्व भर त्याहत्तीनें उचलला आहे असे आपल्याला वाटते

दिपमाळेत हत्ती कोरला आहे. दिपमाळेच्या सर्व भर त्याहत्तीनें उचलला आहे असे आपल्याला वाटते




महादरवाजा / दिंडी दरवाजा : 

भोराईदेवीच्या दर्शनानंतर एका हनुमान मंदिराकडून  एक वाट खालच्या बाजूस जाते . थोड्या दाट जंगलातून जाणारी ही  वाट प्रशस्त असून ती महादरवाजाकडे जाते . या दरवाज्यास दिंडी दरवाजा असेही  म्हणतात म्हणतात. सवाष्णीच्या घाटावरून येणारी वाट दिंडी दरवाज्यात आणून सोडते. रायगडावरील महादरवाजा आणि दिंडी दरवाजा एक सारखेच दिसतात आणि त्यांची संरचना मिळती जुळती आहे .  द्वाराची रचना गोमुखी बांधणीची आहे. दोन भीमकाय बुरुजामध्ये लपल्यामुळे या द्वारास मोठे संरक्षण लाभले आहे. प्रवेशद्वारावर २ सुंदर कोरलेले शरभ आहेत. महादरवाजामध्ये बंदुकिंसाठी जंग्या आहेत. श्रेयसने आम्हाला सांगितले की हा दरवाजा अर्ध्याहून अधिक मातीमध्ये गेला होता. ट्रेक क्षितिज संस्थेने काही संस्थांसोबत काम करून त्याला मोकळा श्वास मिळवून दिला .  श्रेयस ही  या मोहिमेत सहभागी होता हे सांगताना  त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि अभिमान हा अमूल्य होता . मन भरून दिंडी दरवाजा पहिल्यांनंतर श्रेयसच्या शिव  घोषणेने वातावरण भारावून गेले होते . महादरवाजा परिसरातील एक एक कण शिवरायांच्या घोषणेने व्यापून गेला होता. शिवराय म्हणजे दैवत आणि त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडावर आज आम्ही त्यांना जयघोष करत आहोत ही  गोष्ट मनात शंभर हत्तीचे बळ आणणारी होती. परतताना आम्ही जवळच असणारे एक टाके पहिले आणि भोराई देवीच्या मंदिरात येताना आम्हाला महाराष्ट्र राज्याचे मानचिन्ह असलेल्या ब्ल्यू मॉरमॉन फुलपाखराचे इथे दर्शन झाले. ट्रेक करताना असे दुर्मिळ वन्यजीव दिसले की आपला हा अट्टाहास सार्थकी लागला असे वाटते .

महादरवाजा / दिंडी दरवाजा 

महादरवाजा / दिंडी दरवाजाकडे जाणारा मार्ग 



महादरवाजा / दिंडी दरवाजा 

टिम  पाऊल

धोंडसे गावात जाणारा मार्ग 

धान्यकोठार - टकमक टोक - भोरेश्र्वराचे मंदिर : 

रात्रीची अपुरी झोप आणि सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंतची भटकंती शरीराला आव्हाहन देत होती. महादरवाजा पहिल्या नंतर टकमक टोकाकडे जावे की नाही हा प्रश्न होता . पण  सर्वच मुरलेले ट्रेकर्स असल्याने टकमक टोक करायचे असे ठरले. नवीन मुले ही  मागे राहिली नाहीत. आलो आहे तर पाहून जायचेच हे त्यांनी ठरवले .   सुधागडचे ३ भाग आहेत . त्यापैकी टकमक टोकाचा भाग दुसरा आहे .वाटेत असणाऱ्या  ४ धान्य कोठाराला भेट देऊन आम्ही टकमक टोकाकडे चालू लागलो. धान्यकोठारे आकाराने मोठी असून त्यांचे मोजमाप सारखे आहे .  टकमक टोकाकडे जाताना डोक्यावर उन्ह होते आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ दिसत होता.  दातपाडी नदीचे खोरे खूप सुंदर दिसत होते . सुधागडचे टकमक टोक हे  रायगडाच्या टकमक टोकासारखे दिसते म्हणून यास टकमक असे नाव आहे. टोकाच्या शेवटच्या भागावरच सोसाट्याचा वारा मनातील धडकी भरवत होता. आळीपाळीने टोकावर जाऊन आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली . पंत सचिवांच्या वाड्याजवळ असलेल्या भोरेश्वर मंदिराचे दर्शन घेतले. या शिव मंदिरात आपल्याला अनेक देवतांच्या मूर्ती दिसतात. वाडा आणि मंदिरामध्ये एक विहीर ही  आहे . दर्शन घेऊन आम्ही ठाकूरवाडी कडे निघालो . श्रेयस - अमर - धवल आणि मी पाणी भरण्यास टाक्यांकडे गेलो आणि बाकी ट्रेकर्सना पुढे जाण्यास सांगितले .




टकमक टोकाकडे जाताना लागणारे शिवलिंग 



हुल्लडबाजीला विरोध :

टाक्यातील पाणी भरून परतत असताना महेश आणि अनिकेतने आवाज दिला की काही मंडळी कमळ तलावात पोहत आहेत . आम्ही लागलीच तिथे गेलो आणि त्यांच्या ग्रुप लीडरला समजावले की  असे करणे सर्वस्वी चुकीचे असून कायद्याने ही  गुन्हा आहे. १५ ते २० जणांचा समूह पाण्यात पोहत होता. आम्ही सांगितल्यावर सुजाण ग्रुप लीडर ने सर्वांना  बाहेर काढले. काही टाळकी ५ मिनिटांसाठी विनंती करत होती पण आम्ही १ मिनिटही पाण्यात राहू दिले नाही .
 काही जण हौस मौज म्हणून गडावरील टाक्यांमध्ये अंघोळी करतात किंवा तळ्यामध्ये  पोहोतात . पुरातत्वीय खात्यानेही अश्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाईचे आदेश दिले आहे . ज्यांना किल्ले संवर्धन करता येत नाही अश्यानी निदान किल्ल्यांवर असे प्रकार करू नये. किल्ल्यांवर दारू पिणे , हुक्का पिणे , टाक्यांमधील पाणी दूषित करणे , बुरुजांवर आणि दगडांवर नावे  लिहणे असे प्रकार निंदनीय आणि दंडनीय आहेत. आपण हे रोखले पाहिजे . शब्दांची भाषा कळली नाही तर लाथा बुक्क्यांचा वापर करण्यास कचरू नये असे मला वाटते . आपला इतिहास आपणच जपला पाहिजे. आपल्या इतिहासाचा आपल्याला अभिमान नसेल तर परकीय गुलामी सहन करण्याची नामुष्की आल्याशिवाय राहणार नाही . दुर्ग संवर्धन आणि दुर्ग स्वच्छता प्रत्येक ट्रेकरचे कर्तव्य असले पाहिजे.


प्रतिबिंब 


टिम  पाऊल  : 

पाऊल आणि सोल्वे ग्रुप असे चांगले समीकरण जमले आहे असे काही ट्रेक पासून दिसून आलं आहे. एका कॉर्पोरेट कंपनीचा एक विभागच आमच्यासोबत जोडला गेला आहे . विग्नेशाने पाऊल सभासदांमध्ये मोलाची भरच घातली आहे. निखिल , हिना , अजय , मोनिका , प्रथमेश हे  ट्रेकमध्ये  मुरू लागले आहेत. प्रथमेश पाटणकरने  ड्रोन हवेत सोडून धमाल आणली.  आता पाऊल मध्ये  परिवारही शामिल होऊ लागले आहेत . आरोलकर - नांदलस्कर परिवारामध्ये मधुरा -सिद्देश - प्रथमेश - पारस ह्यांची बातच वेगळी. सर्व ग्रुप बोर असला तरी हे लोक नेहमी मज्जा करत असतात .  दुसरा परिवार म्हणजे महेश - प्रियांका - दिपक - आकाशचा ! एकमेकांना धरून असणारा हा परिवार पाऊलला ही चांगलाच धरून आहे . त्यांच्या घरातील छोटी ट्रेकर लवकर आम्हाला भेटेल ह्यात शंका नाही . तिसरा परिवार म्हणजे म्हसकर परिवार ! संदिप नेहमी वृक्षारोपण कामात व्यग्र असतो . ह्यावेळी त्याची बहीण दिपाली आणि त्यांचे गुरुजी हनुमान सर ही आले होते . हनुमान सर  तर आमच्या सर्वांचे गुरुजी झाले आहेत.  ह्या वेळी जुन्या परिवारात नवीन माणसाची भर पडली ती म्हणजे धीरजची ! धीरजचा पहिला ट्रेक होता. धवल - जुही आणि धीरज असा परिवार वाढीस जावो अशीच माझी इच्छा आहे . धीरजच्या बकेट लिस्ट मधील एक इच्छा पूर्ण झाली असे जुहीने सांगितलं. मनोज - योगेश - पंकज ह्या मित्राच्या ग्रुपने ही दरवळे प्रमाणे शांत निवांत ट्रेक पुन्हा  केला . आता बात आहे ती जोडगोळी मंडळींची ! रुपश्री - जयेश , प्राची - अभिषेक , मंगेश- भूषण, वेदांत-आदिश  ह्यांनी पण ट्रेक एकमेकांना धरून केला . धीरज सोबत अभिषेक - वेदांत - आदींश ह्यांचा पहिला ट्रेक होता. मला खात्री आहे की त्यांना ट्रेक आवडला असेल.  अमर हा तर पाऊलच्या पहिल्या ट्रेक पासून  पाऊलच्या ७व्या वाढदिवसाच्या ट्रेकला आला . आदित्यला मागचा ट्रेक करता आला नाही पण त्याची ह्या ट्रेक ला लॉटरी लागली आणि त्याने मूर्ती लहान पण कीर्ती महान असे दाखवून दिले. तुषार ने ह्यावेळी ३६० डिग्री विडिओ काढले असल्याने त्याचे नामांतरण "तुषार एच डी " पासून "तुषार ३६० डिग्री  " करावे असा प्रस्ताव समोर आला आहे . प्रमोद - श्रेयस - अनिकेत - सचिन - ए बी चव्हाण बद्दल काय बोलावे ! हे लोक असले की धमाल येतेच . ए बी चव्हाणचा डान्स कुणीही विसरणार नाही हे नक्की !

पाऊल ट्रेकर्स 

ये दोस्ती , हम नाही छोढेंगे :

मैत्री ' ही प्रत्येकाच्या जीवनात महत्वपूर्ण ठरते आणि ती आपल्याला सुंदर वळणावर नेऊन ठेवते .  मला कोणी विचारलं ना मैत्री कशी असावी तर माझ्याकडे तसे सांगायला खुप गोष्टी आहेत. पण मैत्रीचा चेहरा मला विचारला तर खालचा फोटो मी दाखवेन. ह्या फोटोतील सर्व चेहरे माझ्या जिवाभावाचे आहेत. आनंदच काय तर दुःखातही माझ्यासोबत असणारी माणसे म्हणजे हीच ! आपल्या आयुष्यात अनेक नाती असतात पण दीर्घकाळ टिकणारं, कधीही न तुटणारं असं नातं म्हणजे मैत्रीचं. ट्रेकमुळे आम्ही एकत्र भेटलो पण आता एकमेकांचे पारिवारिक सदस्य झालो आहोत ही आमची मोठी उपलब्धी आहे असे वाटते . धवल - श्रेयस - तुषार - सचिन - अनिकेत - विग्नेशा हे जसे पाऊलचा कणा आहेत तसेच माझ्या आयुष्यातही एका लाईफ सपोर्ट प्रमाणे आहेत . फोटोतील सर्वच व्यक्तीचे संगठन आणि नियोजन कौशल्य उत्तम आहे . सर्वांना शिवराय - इतिहास - गड किल्ले - समाजकार्य ह्यांबद्दल आवड आहे . चांगल्या कामासाठी नेहमी पुढे असतात आणि काही तरी वेगळे करण्याचा नेहमी पुढे सरसावलेले असतात . ही सर्व मंडळी पिंपळाच्या पानासारखी आहेत , त्याची कितीही जाळी झाली तरी ही पाने जीवनाच्या पुस्तकात आयुष्यभर जपून

ये दोस्ती , हम नाही छोढेंगे 💖
तुषार - विग्नेशा - सचिन - नरेंद्र - अनिकेत - धवल श्रेयस 


गडाचा इतिहास : ( इंटरनेट वरून साभार )

१. शिवरायांनी भोरप गडाचे नाव सुधागड ठेवले. सुधागडच्या पायथ्याशी पाच्छापूर हे गाव आहे. पाच्छापूर हे "पातशाहपूर" या नावाचा अपभ्रंश आहे. याच गावात संभाजी व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर यांची भेट झाली होती.  या गडाची साधारणतः उंची ५९० मीटर आहे. झाडांमध्ये लपलेला हा गड विस्ताराने फारच मोठा आहे.
२. इ.स. १६४८ साली हा किल्ला स्वराज्यात सामील झाला. याबाबत असा उल्लेख आढळतो की, 'साखरदर्यात मालवजी नाईक कारके यांनी माळ लाविली. सरदार मालोजी भोसले यांच्या हाताखाली जाधव आणि सरनाईक हे प्रथम किल्ल्यावर चढले. या धारकर्‍यांना उभे करून त्यांचे पाठीवर हैबतराव चढले. त्यास संभाजीराव पुढे जाऊन माथा गेले. पंचविसाने पुढे जाऊन गस्त मारिली. बोकडसिलेचा पहारा मारला. पुढे भोराईच्या टप्प्यावरी गेले तो सदरेतून किल्लेदार व लोक धावत आले. हाणहाण झाली त्या समयी किल्लेदार कामास आले. उपरांतिक जाऊन सदर काबीज केली.
३. शिवरायांनी या गडाचे भोरपगडावरून सुधागड असे नामकरण केले. इ.स. १६४८मध्ये हा गड शिवरायांच्या अधिपत्याखाली आला. राजधानीसाठी याही गडाचा विचार शिवरायांनी केला होता, असे सांगितले जाते.
४. गडाच्या पायथ्याशी असलेल्या 'पाच्छापूर' या गावातच छत्रपती संभाजी राजे व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर याची भेट झाली होती.
सुंदर नजारा - चिलखती बुरुजावरून 

सूर्याचा लपंडाव 

शांत - निवांत - धीरगंभीर 


मार्किंग 



पंत सचिवांच्या वाड्यात केलेलं सहभोजन ! 


नरेंद्र - प्रियांका - रुपश्री - जयेश - सचिनजी लांडेजी 


दूरवर तैलबैला आणि घनगड !

शिडीची वाट 

वेदांत - आदिश 















6 comments:

  1. What a wonderful blog Narya !
    Well articulated
    Awesome photographs
    Blessed to have amazing friend like you
    Keep it up 👍🏻

    ReplyDelete
  2. Khup chaan ...sampurn mahiti dili sir ...nice

    ReplyDelete
  3. Khup chan mahiti itaratra kotehi pahayala milali nahi khup khup chan blog. harvun gelo vachtana

    ReplyDelete
  4. खूप छान माहिती दादा यूट्यूब चॅनल ब्लॉग साठी इतिहास शोधत होतो वाचून खूप मस्त वाटत
    आमच्या चॅनल ला नक्की भेट द्या Pravas Gadkillyancha

    ReplyDelete

जोगेश्वरी लेणी - मुंबई

जोगेश्वरी लेणी -  मुंबई  मुंबई म्हणजे स्वप्नांचे शहर ! ह्या शहरात लोकं आपली स्वप्न पूर्ण करण्याच्या मागे पळत असतात. पण अश्या गजबजलेल्या शहरा...