धोडपचा किल्ला (DHODAP FORT) - २०१५
वर्णन आणि फोटो हे २०१५ सालातील आहेत . आठवणी , संकलित माहिती आणि छायाचित्रांच्या आधारे हा लेख लिहीत आहे
धोडप (एक आठवण) - २०१५
कल्याण ते धोडप दर्शन :
मला प्रवासाची आवड तशी होतीच पण काही वेगळ्या धाटणीचा प्रवास करावा असे सतत वाटे. तो योग लवकरच जुळून आला तो धोडप किल्ल्याच्या ट्रेक मुळे ! त्यात किल्ल्यावर गुहा होती आणि तिकडे मस्त रहाता येणार असल्याने काही तरी वेगळे आणि चाकोरीबाह्य करणार ह्याची मला खात्री झाली होती. ट्रेक म्हंटले की रानावनात स्वछंद भटकून आपल्या इप्सित स्थळावर पोहोचून निसर्गाच्या सुंदरतेचा अनुभव घेणे होय असे मला सुरुवातीला वाटे . पण मला जे अनुभव आले त्यामुळे ट्रेकिंगची व्याख्या मला खूप नव्याने उलगडली. ट्रेकिंग म्हणजे फक्त भटकेगिरी नसून निसर्गाचा आस्वाद घेत त्याच्या संवर्धनाची कास धरणे हे मला नव्याने उमगले. ट्रेकिंग किल्ल्याच्या गडमाथ्यावर करणार असल्यामुळे मला इतिहासाचा मागोवा घेता आला आणि त्या प्रदेशाची भौगोलिक उपयुक्तताही कळली. प्रवासाची गंम्मत जंमत आणि सोबत स्वतः तीन दगडांच्या चुलीवर बनवलेले जेवण माझ्यासाठी अवस्मरणिय ठरले.
 |
| धोडप गडावरील गुहेच्या जवळून काढलेले छायाचित्र : लोहगडचा विंचूकडा आणि रायगडचे टकमक टोकासारखे हे दिसते |
 |
| धोडप वरून होणारा सूर्योदय ( सौजन्य : धवल भंगाळे ) |
कळसुबाई आणि साल्हेर पाठोपाठ शिखरांच्या उंचीनुसार धोडपचा महाराष्ट्रात पाचवा क्रमांक लागतो. माहिती नुसार मला कळले की किल्ल्याची समुद्रसपाटी पासून उंची १४७३ मीटर आहे. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्य शिखर आहे हे मला माहिती होते पण साल्हेर हे दुसऱ्या क्रमांकाचे आणि धोडप हे पाचव्या क्रमांकाचे शिखर आहे हे मला नव्याने कळले. आम्ही कल्याण ते नाशिक रोड असा ट्रेन ने प्रवास करून भल्या पहाटे नाशिकला पोहोचलो. तिथून पुढे आम्हाला एसटीने प्रवास करावा लागला . थंडीचे दिवस होते आणि कड्याक्याची थंडी वाजत होती . पहाटे ६ वाजताच आम्ही वडाळीभोई फाट्यावर उतरलो. सकाळी सर्वत्र शुकशुकाट होता आणि एक चहाचे दुकान उघडे होत होते. फाट्यापासून आम्हाला हट्टी ह्या गावाकडे जाण्यासाठी ६ आसनी रिक्षा पहाटे ६.३० ला मिळणार होती. चहाच्या दुकानावर मस्त चहा घेऊन आम्ही ६ आसनी रिक्षा पकडली आणि धोडांबे गावावरून हट्टी ह्या धोडप किल्ल्याच्या पायथ्याच्या गावापाशी आलो. हट्टी गावात पोहोचल्यावर आम्हाला प्रचंड धोडप किल्ला आणि इखारा सुळक्याचं दर्शन झाले. अजस्त्र आणि विशाल धोडप पाहून आम्ही सर्व थक्क झालो .
 |
| हट्टी गावातून दिसणारा धोडप |
 |
| अवघड चढण सोपी करण्यासाठी लोखंडी शिड्या लावल्या आहेत |
 |
| ह्या मारुती मंदिराजवळून जाणारा रस्ता गडमाथ्यवर जातो |
ट्रेकला सुरुवात :
गावातच आम्ही माहिती फलक वाचला. थोडी विश्रांती घेऊन आम्ही लगेचच ट्रेकला सुरुवात केली. गावकऱ्यांना गडाच्या वाटा विचारल्या आणि कोवळ्या उन्हामध्ये आम्ही निसर्गाच्या त्या कलात्मक रचनेच्या जवळ जाऊ लागलो. समोर दिसणारा धोडपचा अजस्त्र कातळ आणि त्याचा आकार मनात धडकी भरवत होता. शंकराच्या पिंडी सारखा आकार असलेल्या किल्ल्याची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे झालेली आहे. लाव्हारस हा विशिष्ट प्रकाराने साठत जातो. तो थंड होतो आणि बेसॉल्ट खडका ची मोठी भिंत तयार होते त्याला डाइक असे म्हणतात. आश्चर्याची बाब म्हणजे ह्या डाईकच्या सरळसोट भिंती मध्ये मोठी वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक खाच तयार झालेली आहे. म्हणून धोडप हा किल्ला सह्याद्रीच्या रांगेमध्ये चटकन ओळखता येतो. पहिल्या २० मिनिटात मला ह्या नवीन गोष्टी काळात होत्या आणि आपण फक्त किल्ल्यावर न जाता एका नैसर्गिक चमत्काराकडे जात आहोत असे मला वाटत होते .
 |
| गणेश टाक - छोट्या तळ्यात एक सुंदर गणेशमूर्ती पाहता येते |
 |
| शिवमंदिर |
किल्ल्याची चाहूल आणि डोंगरमाथ्यापर्यंत वारी :
सपाट रस्त्यावर तळ्याकाठी वळसा मारून आम्ही पुढे चालू लागलो . लगेच एक हनुमानाचे मंदिर आम्हाला दिसले आणि तिथे चढण सुरु झाली. मोठ्या मोठ्या चढणी पार करून माझी दमछाक होत होती . पुढे गेल्यावर एक छोटे तळे ( गणेश टाकं ) आले तिथे एक छोटी गणपतीची मूर्ती होती आणि त्या बाजूलाच वनखात्यांने बांधलेली काही विश्रांतीगृह वजा घरे दिसली . तळ्याचे पाणी स्वच्छ होते आणि निवांत सावली होती. अजून खूप अंतर कापायचे होते. वेळ ना वाया घालवता आम्ही पुढे चालू लागलो . लवकरच गडाच्या पहिल्या टप्प्यावर आलो . तिथे एक शिवमंदिर होते. आजुबलूला जास्वदींची झाडे होती . मधूनच सोसाट्याचा वारा थकवा दूर करत होता. मंदिरात दर्शन घेऊन आम्ही दुपारी आणि रात्रीच्या जेवणाची लाकडे गोळा केली. किल्ल्याच्या अस्तित्वाची चिन्हे येथे दिसू लागली होती. मंदिराशेजारी दुमजली एक विहीर आहे. विहिरींमध्ये उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. ही विहीर स्थापत्य शास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना असून ती आपलं लक्ष वेधून घेते.
(विहिरीची छायाचित्रे शेवटी दिली आहेत) या पुढे रास्ता अजून कठीण होत जाणार होता आणि सूर्य ही हळू हळू डोक्यावर येत होता. या विहिरीला लागून एक वाट सरळ वर जाते . या ठिकाणापासून थरारकता वाढली. नंतर एक लोखंडी जिना आला. खरंतर ह्या ठिकाणी कातळात कोरलेल्या पायऱ्या स्पष्ट दिसत होत्या. बाजूला मूळ वाट होती. पण त्यांचा एक मोठा भाग ढासळून ही वाट अवघड होऊन बसली आहे. त्यामुळे हा लोखंडी जिना लावला आहे. पाच मिनिटात आम्ही दोन बुरुजांपांशी पोचलो आणि पुढे दगड कोरून बांधलेला दरवाजा आला. हा दरवाजा म्हणजे बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार. येथील दगडी खोदीव पायऱ्या बघण्यासारख्या आहेत. दरवाजाच्या परिसरात काही शिलालेख आढळले. सोळाव्या शतकात किल्ला नगरच्या निजामशाहाकडे होता. निजामशाही नष्ट करण्यासाठी आलेल्या मुघलांच्या सरदार अलावर्दीखानाने हा किल्ला जिंकून घेतला. ह्याचा उल्लेख ह्या शिलालेखात आहे.
 |
| ह्या ट्रेक ला एकाच दादा म्हणजे आमचा अवि दादा . सर्वांचा भार वाहण्यास समर्थ ! मग लाकडाच्या मोळीचे काय घेऊन बसला आहात 😅 |
 |
दरवाज्याच्या डाव्या बाजूला खडकावर मोठा एक शिलालेख सातमाळ रांगेतील धोडप किल्ला अलावर्दीखानाने जिंकून घेतल्याचा उल्लेख आहे |
 |
| गडमाथ्यावरील गुहा : येथे २० ते २५ जण राहू शकतात |
गडाच्या टपावर पोहोचलो तेव्हा बरे वाटले . लाकडांचे ओझे आळीपाळीने सर्व जण घेत गडमाथ्यावर आले . वर आल्यावर जो आनंद झाला तो खरे तर अवर्णनीय आहे . वर येताना दिसलेले सुंदर डोंगररांगांचे नजारे खूप सुंदर होते. ज्या गावामधून आम्ही सुरवात केली ती आता दूर लांब राहिली होती आणि समोर एक मोठे क्षितिज होते . आजूबाजुला गडावर काही भग्न अवशेष आणि पडीक राजवाडे पहिले . त्याना पाहून त्यांच्या गतवैभवाची कल्पना आली. आता थेट गुहा गाठायचं आम्ही ठरवलं. समोरील कातळास उजवीकडे ठेऊन आम्ही पुढे चालू लागलो. पाच एक मिनटात आम्ही आमच्या मुक्कामाच्या गुहेत पोचलो. गुहेमध्ये देवीची विलोभनीय मूर्ती आहे. तिला नमन करून आम्ही डाईक कडे प्रस्थान केले. चार साडेचार तास पायपीट करून सह्याद्रीच्या एका उंच आणि विशिष्ट भौगोलिक रचना असलेल्या किल्ल्यावरून दिसणाऱ्या दृश्याने मनास जे समाधान आणि जो अनुभव मिळत होता, तो शब्दांकित करणं केवळ अशक्य !! हा अनुभव प्रत्यक्ष तेथे जाऊनच अनुभवण्यासारखा आहे. गुहेशेजारीच पिण्याच्या पाण्याचं टाकं आहे आणि त्याची चव ही शहरी पाण्याला लाजवेल अशी आहे.
 |
| गुहेतून घेतलेले छायाचित्र |
धोडप चे अविस्मरणीय चुलीवरचे जेवण आणि ताऱ्यांची जत्रा :
संध्याकाळी सुंदर असा सूर्यास्त पाहत आम्ही चूल पेटवली . चुलीवर बनवलेली फक्कड चहा घेत आणि गप्पा मारत आम्ही खूप चांगले क्षण अनुभवले. सहज चालत डाईकच्या त्या सरळ कापाजवळ आम्ही आलो . सुरक्षेसाठी तिथे रेलिंग आहे . तिथून जो नजारा दिसतो तो खूप अवर्णनीय आहे . हळू हळू रात्र होत गेली . चुलीवर छान खिचडी आणि मॅग्गी चा बेत झाला . सर्वांनीच खूप मेहनत घेऊन जेवण बनवले आणि अथक मेहनतीनंतर जेवणाची जी चव होती ती एखाद्या चांगल्या हॉटेलातील जेवणालाही हरवेल. जेवणानंतर आम्ही गुहेत झोपायची तयारी केली पण त्या पूर्वी चांदण्या आकाशात एक फेरफटका मारणे हे ओघाने आलेच. रात्री वातावरण खूप छान होत . गडाच्या माथ्यवर बसून आम्ही अनेक नक्षत्रे पहिली . तारे निरीक्षणासाठी खूप चांगले आभाळ होते. ताऱ्यांची जणू जत्राच भरली होती . आकाशगंगेचा पट्टा आणि अचानक तुटलेले तारे पाहता येणे हे सर्व स्वप्नवत वाटत होते. एक तारा तुटलेला दिसतो ना दिसतो तेच दुसरा तारा निखळून पडलेला दिसे ! आभाळ इतके स्वच्छ होते की अवकाशयान (सॅटेलाईट) ही दिसले . सर्वच भारावलेले होते. आम्ही खूप गप्पा मारल्या. आकाश तारे ह्या विषयांवर बोललो. मनसोक्त आकाशदर्शन करून आम्ही गुहे कडे निघालो. आज मी खूपच नवीन गोष्टी शिकलो. मन प्रसन्न होते पण शरीर थकलेल. मला लागलीच निवांत झोप लागली
 |
| रात्रीच्या जेवणाची पंगत : धवलचा अँटिना बॅटरीचा जुगाड ह्या छायाचित्रात तुम्हाला दिसेल |
 |
| स्वयंपाकखाना आणि स्वयंपाकी |
 |
| अमृततुल्य चहा |
परतीचा प्रवास आणि दिवस दुसरा :
दुसरा दिवस उजाडला तो सुंदर अश्या सूर्योदयाने . नारंगी रंगांच्या छटा आणि क्षितिजावरून उगवणारा सूर्य पाहून प्रसन्न वाटले. रोजच्या जीवनापेक्षा वेगळाच अनुभव आम्ही सर्व जण घेत होतो. आमचा दिवस उजाडला. पुन्हा सकाळी मस्त चहा झाला. आवरून आम्ही आजूबाजूच्या गुहा न्याहाळल्या. काही गुहा नैसर्गिक आहेत तर काही तासून बनवलेल्या आहेत. गडाच्या सुळक्याकडे आता नीट न्ह्याहाळून पहिले तेव्हा आम्हाला जानवलेकी याला सर कारण्यासाठी क्लाइंबिंगचे शिक्षण जरुरीचे आहे. निवांत सकाळी नाश्ता करून आम्ही परतीचा प्रवास सुरु केला . जाताना हि काही तरी वेगळा अनुभव घ्यावा म्हणून आम्ही इकारा सुळक्याकडे च्या बाजूने गेलो. जातानाही आम्हाला अनेक तटबंदी आणि एक सुंदर दरवाजा दिसला . पुढे जाऊन एक राजवाडाही दिसला. इकारा सुळक्याजवळ मच्छिन्द्रनाथांचे मंदिर पाहून आम्ही धोडांबे गावात पोहोचलो . परतीचा प्रवास सुखकर होता . अश्या रीतीने आम्ही ट्रेकवरी पूर्ण केली . परत येताना मी अनेक आठवणी घेऊन आलो.
 |
| शिलालेख |
 |
| धोडांबे गावाकडे जाताना परतीच्या प्रवासात लागलेले प्रवेशद्वार |
 |
| "इखारा" सुळका |
कधीच न विसरता येण्या जोगे :
स्नेहाची हि पहिली ट्रेक होती . ट्रेकिंग चा अनुभव तिने धोडप पासून घेतला . तिला हा ट्रेक नक्कीच आठवणीत राहील . विग्नेशा - सोनल आणि वैशाली ह्यांनी नेहमीच उत्तम जेवणात हातभार लावला आहे . ह्या तिघी नसत्या तर कदाचित धोडपचे किस्से रंगवून आमची हि ट्रेक अजरामर झाली नसती . अविनाश दादा ची ही दुसरी ट्रेक.लाकडे वाहण्यात त्याच्या सारख्या बलदंड माणसाचा आम्ही सढळ उपयोग केला . शशांक नेहमी प्रमाणेच शांत निवांत , एकदम कॅप्टन कूल माणूस आणि प्रत्येक गोष्टी मध्ये समरस होणार असतो. हरीश ने ह्यावेळी चुलीवरच्या जेवणाचा डिप्लोमा पास केला . पुढील ट्रेक ला जेवण कसे बनवावे ह्याची पदवीची परीक्षा तो देईल . :) . सर्वात शेवटी आपला माणूस धवल! चांगला ट्रेक लीडर म्हणजे चांगल्या ट्रेक ची खात्री असते . धवलला गडाचा इतिहास , गडाची भौगोलिक माहिती अगदी चोख माहिती होती . खगोल आणि अवांतर ज्ञान चांगले असल्याने आमच्या ज्ञानात खूपच भर पडली .
 |
| प्रत्येक टप्प्यावरचे किल्ल्यावरून दिसणारे सौन्दर्य वेगळे आणि विलोभनीय होते |
 |
| सर्व काही पोटासाठी ! |
माकड आणि सोनल :
ह्या ट्रेकला आमच्या सोनलचे सुकत घातलेले कपडे माकडाने पळवून लावले . तिचा आवडता टि शर्ट माकडाने पळविला . एवढे असूनही माकड मंडळींच्या नाशिक मधील ब्रह्मगिरी शाखेतील काही हवऱ्या माकड मित्रांनी सोनल चा पिच्छा काही सोडला नाही. कोणतं जुने प्रेम हे देवाला माहिती 😂 . ब्रह्मगिरी - भंडारदुर्ग ट्रेकला एका माकडाने कडकडीत चावून सोनलप्रतीचे प्रेम (?) व्यक्त केले. वन्य प्राण्यांच्या प्रेमापोटी सोनलला मात्र पोटामध्ये ५ इंजेक्शन घ्यावी लागली. 🙈🙉🙊😆😅😝😜
सवंगडी : धवल , विग्नेशा , अविनाश , स्नेहा , शशांक , वैशाली, ,सोनल , हरीश , नरेंद्र
 |
| पाऊल ट्रेकर्स |
इतिहास :
धोडप उर्फ धारपवणिक हा किल्ला त्यावरील टकी व खोदीव गुहा पाहाता पूरातन किल्ला आहे. याचा उल्लेख मात्र प्रथम १६ व्या शतकात धरब या नावाने येतो, तेंव्हा हा किल्ला नगरच्या निजामशहाकडे होता. निजामशाही नष्ट करण्यासाठी आलेल्या मुघलांच्या सरदार अलावर्दीखानाने निजामच्या किल्लेदाराला १ लाख रुपयाच्या मनसबीची लालूच दाखवून १९ जून १६२६ मध्ये किल्ला ताब्यात घेतला. इ.स. १६७०-७१ मध्ये शिवाजी महाराजांच्या सैन्याने धोडप किल्ल्याला वेढा घातला, पण त्यांना किल्ला घेता आला नाही.
नानासाहेब पेशवे व हैद्राबादचा निजाम यांच्यात झालेल्या भालकीच्या तहाप्रमाणे धोडप किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. त्यानंतर त्याचा वापर मुख्यत: तुरुंग म्हणून झाला. इ.स. १६७८ मध्ये माधवराव पेशव्यां विरुध्द बंड केलेल्या राघोबांनी (रघुनाथराव पेशवे) धोडप किल्ल्याच्या पायथ्याशी आश्रय घेतल्याचे कळल्यावर माधवराव पेशव्यांनी त्यांच्यावर हल्ला केला, त्यावेळी राघोबांच्या सैन्याने किल्ल्यावर पळ काढला व मोठी लुट माधवराव पेशव्यांना मिळाली. इ.स. १८१८ मध्ये धोडप किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. (संदर्भ : गडावर लावलेला फलक)
 |
| गडावर लावलेला फलक |
 |
| गुहेजवळ लावलेला फलक |
 |
| दरवाज्याच्या डाव्या बाजूला खडकावर मोठा एक शिलालेख |
 |
| धोडांबे गावाजवळ जाताना परतीच्या प्रवासात लागलेला राजवाडा |
दुमजली विहीर :
वरतून घुमटी, एका बाजूने उतरायला पायऱ्या, सुंदर कमानी अशी सुंदर विहीर पुन्हा उत्कृष्ट स्थापत्यकलेचा उदाहरण देते.. हट्टी गावाकडून धोडप किल्ल्यावर जाताना गणेश टाके ओलांडल्यानंतर एक शिवमंदिर येते . तिथून पुढे जाताना आपणास ही दुमजली विहीर दिसते.
 |
| विहिरींमध्ये उतरण्यासाठी पायऱ्या आहेत |
 |
| कमान व पायऱ्या असलेली विहीर |
 |
| विहिरीच्या पायऱ्यांवर |
 |
| विहिरीचे प्रवेशद्वार |
भग्न अवशेष :
या विस्तृत पठारावर असलेल्या झाडीमध्ये लपलेल्या अनेक वास्तू आपल्याला पहायला मिळतात
 |
| भग्न अवशेष - १ - उरल्यासुरल्या अवशेषांमध्ये सुद्धा पूर्वीची कलकौशल्य दिसून येते |
|
 |
| भग्न अवशेष - २ |
 |
| भग्न अवशेष - ३ |
 |
| भग्न अवशेष - ४ |
 |
| सूर्योदय |
Mast.. apratim likhan..
ReplyDeleteधन्यवाद 😊
DeleteApratim.Hats of u all guys
ReplyDeleteधन्यवाद 😊
Deletevery nice blog Dada
ReplyDeleteI just visited Dhodap fort I m also from kalyan west would like to join you for any trek