Wednesday, November 2, 2022

गिल्बर्ट हिल - अंधेरी पश्चिम , मुंबई

 गिल्बर्ट हिल

मुंबईच्या अंधेरी  भागात एक खूप जुनी टेकडी आहे. अगदी मानवी जीवनाच्या आधी निर्मित झालेली !  वाचून आश्चर्य वाटले ना ? पण जवळपास साडेसहा कोटी वर्ष  (66 Million year Ago) ज्वालामुखीच्या लाव्हापासून निर्मित अशी एक टेकडी मुंबईच्या अंधेरी भागात आहे तिचे नाव आहे "गिल्बर्ट हिल" !  "गिल्बर्ट हिल"   इतिहासाचा एक जिवंत साक्षीदार आहे. पृथ्वीवर माणसाचा जन्म २ कोटी वर्षापूर्वी झाला असे मानले तर  मानवी उत्क्रांतीच्या आधी ह्या "गिल्बर्ट हिल" ची निर्मिती झाली आहे. 


ह्या "गिल्बर्ट हिल"  चे काही महत्वाचे आणि आश्चर्यकारक तत्थे  खाली देत आहे 
  • स्थान : अंधेरी पश्चिम , मुंबई 
  • उंची : ६० मीटर ( २०० फूट) 
  • वय : जवळपास साडेसहा कोटी वर्ष
  • दगड : कॉलम्नार बेसॉल्ट 
  • कालखंड : मेझॉइक कालखंड  (३) - सुमारे 252 ते 66 दशलक्ष वर्षांपूर्वी
  • निर्मिती :  ज्वालामुखीच्या उत्पातातून 
  • "गिल्बर्ट हिल निर्मिती ही  हिमालयाच्या निर्मिती आधीची आहे ! म्हणजे हिमालयाचा जन्म होण्या आधीच ह्या टेकडीचे अस्तित्व मुंबई मध्ये होते. 
  • १९५२ मध्ये फॉरेस्ट ऍक्ट अंतर्गत ह्या टेकडीला राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केले आहे 
  • भूगर्भशास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयत्नांमुळे २००७ साली ह्या टेकडीला द्वितीय श्रेणीचा जागतिक वारसाचा दर्जा मिळाला आहे 
  • सरळसोट कॉलमच्या स्वरूपातली ही टेकडी हे  स्तंभीय कॉलम्नर बेसॉल्ट (व्हर्टिकल कॉलोमनर  बेसाल्ट) चे  एक उत्तम उदाहरण आहे 


गिल्बर्ट हिल निर्मिती मेसोझोइक युगात (३) झाली. स्तंभीय कॉलम्नर बेसॉल्ट (व्हर्टिकल कॉलोमनर  बेसाल्ट)पासून बनलेल्या जगात फक्त तीन टेकड्या असून, गिल्बर्ट हिल त्यापैकी एक आहे. 
कॉलम्नर बेसॉल्टची ही रचना फारच दुर्मिळ अशी मानली जाते. अश्या रचनेच्या जगातील तीन टेकड्या खालील प्रमाणे 
  • "गिल्बर्ट हिल" - अंधेरी मुंबई 
  • डेविल्स टॉवर , व्योमिंग , अमेरिका (१) 
  • डेव्हिल्स पोस्टपाइल , कॅलिफोर्निया  , अमेरिका (२) 
गावदेवी माता आणि दुर्गादेवी माता मंदिर


गिल्बर्ट हिलचे आताचे स्वरूप : 

या टेकडीवर गावदेवी माता आणि दुर्गादेवी माता अशी दोन मंदिरे आहेत . समोर छोटे उद्यान आहे . 
मंदिराजवळ जाण्यास पायऱ्या केल्या आहेत. टेकडीच्या भोवताली उंच इमारतींचा  गराडा आहे. 
एक बाजूला मैदान असल्या कारणाने त्या बाजूने "गिल्बर्ट हिल" ची उंची आणि स्तंभीय कॉलम्नर बेसॉल्ट (व्हर्टिकल कॉलोमनर  बेसाल्ट)  स्वरूप नीट पाहता येते 
स्तंभीय म्हणजे कॉलम्नर बेसॉल्टच्या या विशिष्ट रचनेला लॅकॉलिथ असे म्हणतात. या लॅकॉलिथचा शोध लावणाऱ्या अमेरिकन भूवैकज्ञानिक ग्रोव्ह कार्ल गिल्बर्ट यांच्या नावावरून या टेकडीला आज गिल्बर्ट हिल म्हणून ओळखले जाते, असा एक मतप्रवाह आहे. तर दुसऱ्या प्रवाहाच्या मते,  तत्कालिन विभागीय इंग्रज अधिकारी असलेल्या गिल्बर्ट नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याच्या नावावरून हे नाव पडले आहे. 


गिल्बर्ट हिल


गिल्बर्ट हिलची निर्मिती : 
मेसोझोइक युगात लाव्हारसाच्या उद्रेकातून अनेक ठिकाणी अशा लहान-मोठ्या टेकड्या, डोंगर तयार झाले आहेत.  अनेक वेळा बेसॉल्टचे थर  जेव्हा तयार होतात तेव्हा आडव्या स्वरूपात एकावर एक साचतात आणि एक मजबूत बेसॉल्टचा डोंगर तयार होतो पण अश्या प्रक्रियेला गिल्बर्ट हिल अपवाद आहे . क्रिटेशस युगाच्या अंतकाळी, म्हणजेच साधारण साडेसहा कोटी वर्षांपूर्वी भारतीय उपखंड आफ्रिकेजवळ म्हणजे आताच्या हिंदीमहासागरात होता. हा भूभाग हळूहळू ईशान्येला सरकत होता. याच काळात काही भूगर्भीय हालचालींमुळे ज्वालामुखींचे उद्रेक होऊ लागले. साधारण तीसेक हजार वर्षे हा अग्निकल्लोळ सुरू होता. लाव्हा विविधरूपांनी अवतरत होता. यातूनच दख्खनच्या पठाराचा , मुंबईचा आणि गिल्बर्ट हिलचा  जन्म झाला. गिल्बर्ट हिलची हा एका मोठ्या भौगोलिक घटनेच्या इतिहासाचा साक्षीदार आहे . 

स्तंभीय कॉलम्नर बेसॉल्ट (व्हर्टिकल कॉलोमनर  बेसाल्ट)



मालाड स्टोन :

गिल्बर्ट हिलची माहिती वाचताना आतंरजालावरून  काही अजून माहिती नव्याने समजली. 
मुंबईपरिसरात अशाच प्रकारच्या ह्रायोलाइट, ट्रॅकाइटसारख्या अग्निजन्य खडकांच्या स्तंभीय रचनाही पाहायला मिळतात. यापैकी प्रमुख दोन ठिकाणे म्हणजे भाईंदरजवळील उत्तन डोंगरी आणि कांदिवली-मालाड परिसरातील बाणडोंगरी. उत्तन डोंगरी परिसरातील याच दगडाचा वापर १६व्या शतकात पोर्तुगीजांनी तोफांचे दगडी गोळे बनवण्यासाठी केला होता. असे तोफगोळे त्यांच्या वसई आणि गोवा या दोन्ही प्रांतात सापडले आहेत. तर बाणडोंगरीचा दगड मात्र वेगळ्या पोताचा असल्याने १९व्या-२०व्या शतकात 'मालाड स्टोन' म्हणून नावारूपाला आला. याच टेकडीतून खोदून काढलेल्या दगडातून १८६० ते १९३०च्या दरम्यान डेविड ससून लायब्ररी, वेस्टन रेल्वे बिल्डिंग अशा अनेक वारसा इमारतींची निर्मिती झाली. (*महाराष्ट्र टाइम्स संदर्भ : (टीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स | Updated: 19 Jun 2021)

१) डेविल्स टॉवर , व्योमिंग , अमेरिका 

निर्मिती :  ट्रायसिक कालावधी  (Triassic Period) : २५२ ते २०१ दशलक्ष वर्षांपूर्वी 
डेव्हिल्स टॉवर हे  " बेल्ले फोरचे"  (Belle Fourche) नदीच्या खोऱ्या पासून  १२६७ फूट (३८६ मीटर) उंच आहे. 
त्याच्या शिखराची समुद्रसपाटीपासून ५११२ फूट (१५५८ मीटर) उंची आहे.
२० पेक्षा जास्त नेटिव्ह अमेरिकन म्हणजेच  जास्त मूळ अमेरिकन जमातींसाठी  ते एक पवित्र स्थान, 
या टॉवरला बेअर लॉज म्हणून देखील ओळखले जाते.

डेविल्स टॉवर , व्योमिंग , अमेरिका 


२) डेव्हिल्स पोस्टपाइल , कॅलिफोर्निया  , अमेरिका 

निर्मिती :  सुमारे 1,00,000 वर्षांपूर्वी, प्युमिस फ्लॅटच्या उत्तरेला ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि सॅन जोक्विन नदीच्या मिडल फोर्कची  दरी वाहणाऱ्या बेसल्टिक लावाने भरली. 
अमेरिका देशाने डेविल्स टॉवर आणि  डेव्हिल्स पोस्टपाइल असणाऱ्या भागाला राष्ट्रीय उद्यान घोषित करून ते संसरक्षित केले आहे. भारतात मात्र थोडी उदासिनता असलेले चित्र दिसते 

डेव्हिल्स पोस्टपाइल , कॅलिफोर्निया  , अमेरिका 



३) मेसोझोइक युग म्हणजे काय ? 

मेसोझोइक युगला  सरपटणाऱ्या प्राण्यांचे युग आणि कॉनिफर्सचे युग देखील म्हटले जाते.  हा पृथ्वीच्या भूगर्भशास्त्रीय इतिहासाचा दुसरा ते शेवटचा युग आहे, जो सुमारे २५२  ते ६६ दशलक्ष वर्षांपूर्वीचा आहे आणि त्यात ट्रायसिक, जुरासिक आणि क्रेटेशियस कालावधीचा समावेश आहे.
मेसोझोइक (Mesozoic)
  • ट्रायसिक कालावधी ( The Triassic Period) :   २५२ ते २०१ दशलक्ष वर्षांपूर्वी.
  • जुरासिक कालावधी  ( The Jurassic Period ) : २०१ ते १४५ दशलक्ष वर्षांपूर्वी.
  • क्रेटेशियस कालावधी (  The Cretaceous Period ) : १४५ ते ६६ दशलक्ष वर्षांपूर्वी.


पाऊल ट्रेकर्स : नरेंद्र , अमर , धवल , जुही, अनिकेत , राजेश  





बद्रीनाथाचे दर्शन ! १७.०६. २०२४

 बद्रीनाथाचे दर्शन !   केदारनाथ धाम , तुंगनाथ महादेवमंदिर आणि  चंद्रशिला शिखर असा प्रवास करत आम्ही  उत्तराखंड राज्याच्या दोन धाम यात्रेच्या ...