Saturday, July 26, 2025

बद्रीनाथाचे दर्शन ! १७.०६. २०२४

 बद्रीनाथाचे दर्शन ! 

 केदारनाथ धाम , तुंगनाथ महादेवमंदिर आणि  चंद्रशिला शिखर असा प्रवास करत आम्ही  उत्तराखंड राज्याच्या दोन धाम यात्रेच्या  शेवटच्या टप्प्यात पोहचलो होतो . आमचा शेवटचा टप्पा होता तो बद्रीनाथ धामचा ! 

आदल्या रात्री सर्वांनी  मिळून  बद्रीनाथ मंदिरात थेट न जाता आम्ही माणा  गावात जाणायचे ठरवले . माणा हे उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यात बद्रीनाथ धामपासून अवघ्या ४ किलोमीटर अंतरावर असलेले एक अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक गाव आहे. हे गाव 'भारतातील पहिले गाव' म्हणून ओळखले जाते, कारण ते भारत-तिबेट (चीन) सीमेवरील शेवटचे मानवी वस्ती असलेले गाव आहे.  माणा गाव हिमालयाच्या उंच पर्वतरांगांनी वेढलेले आहे, ज्यामुळे येथील नैसर्गिक सौंदर्य खूपच विस्मयकारक आहे. माणा गावातील घरांवर आणि सार्वजनिक ठिकाणी आढळणारी भित्ती चित्रे येथील स्थानिक कला आणि संस्कृतीचे उत्तम उदाहरण आहेत. बद्रीनाथ धाम आणि माणा गाव हे हिमालयाच्या सुंदर डोंगररांगांनी  वेढलेले आहे. हिमालयाचे विशाल आणि उंच डोंगर पाहिले की माणूस पूर्णपणे थक्क होऊन जातो. त्याची भव्यता आणि अथांगता मनाला भारावून टाकते. आपण किती लहान आहोत याची जाणीवही  या वेळी होते. 



बद्रीनाथ मंदिर , सायंकाळी ७ च्या सुमारास 



व्यास गुफा, गणेश गुफा, भीमपूल ,सरस्वती नदी आणि  पांडवांच्या स्वर्गारोहणाचा मार्ग पाहून आम्ही माणा ते बद्रीनाथ मंदिर असा  परतीचा प्रवास सुरु केला . प्रवासाच्या सातव्या दिवशीही  सकाळी माणा गाव फिरताना पायपीट झाल्याने शरीर पार थकून गेले होते. आमच्या यात्रेचा कळस  म्हणजे बद्रीनाथाचे दर्शन ! त्या साठी आम्ही उत्सुक होतो. पण मंदिराच्या जवळ आल्यावर आम्हाला दिसले की  दर्शन रांग ४ किलोमीटर पेक्षा लांब आहे . त्या रांगेचे शेपूट शोधायलाच आम्हाला तासभर गेला. रांग  शिस्तीची होती .  रांगेत कधी शांत तर कधी  खोडकरपणा करत आम्ही सर्वजण आपल्या आपल्या परीने एकमेकांना हसवत पुढे सरकत होते. गेले काही दिवस आमचा पूर्ण प्रवास हिमालयाच्या डोंगररांगात आणि हिमालयातील घाटांमध्ये चढाई उतराई करण्यात गेला होता . ट्रेकिंग, थकवणारे चढ उतार, अरुंद, वळणावळणाच्या वाटा आम्ही एकत्र पार करत इथवर पोहचलो होतो. ह्या पूर्ण प्रवासात एक संघ म्हणून आमच्यामध्ये एकमेकांबद्दलचा विश्वास आणि प्रेम वाढले होते. यात्रेत विलक्षण आणि अविस्मरणीय अनुभव आम्ही सर्वानी घेतले होते. येतील तो क्षण आनंदात जगात आम्ही इथवर पोहोचलो होतो . आज आमच्या यात्रेच्या  अंतिम ध्येयाकडे आम्ही सर्व हळू हळू पुढे जात होतो. आमच्या सोबतीला अलकनंदा नदी वाहत होती . नदीचा खळखळणारा आवाज ऐकत हळू हळू मंदिराच्या मुख्य दरवाजाजवळ आम्ही  ठेपलो. 



अलकनंदा नदी आणि बद्रीनाथ मंदिर परिसर 



मंदिराचा बाह्य भाग आकर्षक आणि चमकदार रंगांनी रंगवलेला होता.  विशेषतः पिवळा, लाल आणि निळा हे रंग आजूबाजूच्या हिरव्यागार निसर्गाच्या आणि बर्फाच्छादित शिखरांच्या पार्श्वभूमीवर उठून  दिसत होते. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार भव्य आणि रंगीबेरंगी आहे, ज्याला सिंहद्वार असे म्हणतात. या प्रवेशद्वारातून आत प्रवेश करण्यासाठी रुंद पायऱ्या आहेत. सिंहद्वाराच्या शीर्षस्थानी तीन सोन्याचे कलश आणि मध्यभागी एक मोठी घंटा लटकलेली आहे. उंच उडी मारून पहिल्याच फटक्यात घंटा वाजवण्याचा आम्ही सर्वांनी  प्रयत्न केला आणि अनेक जण त्यात यशस्वी पण झाले .




मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार 
 

पुढे आम्ही सर्व जण दर्शन मंडपाजवळ आलो.  हा सभामंडपाच्या पुढे असलेला भाग आहे, जिथून भाविक देवाचे दर्शन घेतात. त्यावेळेस सर्वांचे दर्शन त्या मंडपातूनच येणार होते. मंडपासमोर आल्यावर दर्शनाची रांग अचानक पुजाऱ्यांनी थांबवली.  ४ तासापेक्षा जास्त वेळ रांगेत उभे राहून आलो आणि देवाच्या दारातच रांग थांबली म्हणून आमचे मन थोडे धस्स झाले. मग एक विलक्षण प्रसंग घडला जो आजही मला आठवतो. अमरने खिशातून चंदनाचे अर्क असलेली कुपी काढली आणि सर्वांच्या हातावर लावायला सुरवात केली . अमर म्हणजे भारी अध्यामिक माणूस ! 

मी :  चंदन का लावत आहे अचानक ?
अमर : चंदन विष्णू देवाला प्रिय आहे ! आणि बद्री विशाल हे विष्णूचे रूप आहे. 
मी : अरे मग २ वेळा चंदन लाव !
रिचा : २ वेळा नको तू ४ वेळा चंदन लाव म्हणजे आपल्याला लवकर दर्शन मिळेल ! 
असा संवाद चालू असताना पुजारी आला आणि म्हणाला , " सब यात्री बाये से आ जाये , सबका दर्शन गर्भगृह से होगा ! " 

बस्स ! जणू चंदनाने आपले काम चोख केले होते. त्या क्षणी अमर म्हणजे आमच्या साठी देवाचा प्रेषित आहे असे वाटले होते . गर्भगृह हा मंदिराचा सर्वात पवित्र आणि मुख्य भाग असतो. आता आपल्याला  भगवान बद्रीनारायण अजून जवळून पाहता येणार होते म्हणून आम्ही खुश होते. सुंदर नक्षीकाम केलेले ते विशाल कपाट (दार) उघडले गेले.  " बद्री विशाल की  जय ! " असा जयघोष  करत आम्ही आत शिरलो आणि देवाचे मनापासून दर्शन घेतले.  देवाच्या अस्तित्वाची जाणीव त्या वातावरणात होती . देवाला पाहून मन भारत नव्हते आणि पाय ही  गर्भगृहातून हलत नव्हते. शेवटी आतून नीट दर्शन  घेऊन आम्ही सर्व मंदिर परिसरात स्थिरावलो. मन शांत झाल्यासारखे वाटत होते . तेजस आणि श्रेयस ह्यांनी रामरक्षा पठण  केले. रामरक्षा चालू असताना आज देव आपल्या सोबत आहे, असा विश्वास वाटत होता. मला तेव्हा उमगत होते की हे स्थान केवळ धार्मिक नसून, ते आध्यात्मिक शांती आणि निसर्गाच्या भव्यतेचे प्रतीक आहे.  



ऐतिहासिक वृत्तांत असे सूचित करतात की हे मंदिर ५०० ईसापूर्व पासून अस्तित्वात होते.


बद्रीनाथ धामबद्दलची माहिती : 

१. बद्रीनाथ धाम हे हिंदू धर्मातील चार प्रमुख धामांपैकी एक आणि अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे. 
२. अलकनंदा नदीच्या काठी, समुद्रसपाटीपासून सुमारे ३,१३३ मीटर (१०,२७९ फूट) उंचीवर वसलेले बद्रीनाथ धाम हे भगवान विष्णूंना समर्पित आहे.
३. बद्रीनाथ धाम साक्षात भगवान विष्णूचे निवासस्थान मानले जाते.  मंदिरात भगवान विष्णूंची शाळीग्राम शिळेची मूर्ती योगासन मुद्रेत (पद्मासनात) विराजमान आहे. जगातील बहुतेक विष्णू मंदिरांमध्ये त्यांची उभी मूर्ती असते, परंतु बद्रीनाथमध्ये ते ध्यान मुद्रेत आहेत. याशिवाय, येथे कुबेर, नारद मुनी, उद्धव, नर आणि नारायण यांच्या मूर्तीही आहेत
४. नर आणि नारायण नावाच्या दोन पर्वतरांगांच्या मधोमध वसलेले आहे. पौराणिक कथेनुसार, भगवान विष्णूंचेच अवतार असलेले नर आणि नारायण यांनी या ठिकाणी मानवतेच्या कल्याणासाठी अनेक हजारो वर्षे तपश्चर्या केली होती. यामुळे या स्थानाला 'नर-नारायण क्षेत्र' असेही म्हणतात.
५. आदि शंकराचार्यांचे योगदान: आठव्या शतकात आदिगुरु शंकराचार्यांनी अलकनंदा नदीतून भगवान बद्रीनाथांची शाळीग्राम शिळेची मूर्ती शोधून काढली आणि ती सध्याच्या मंदिरात स्थापित केली, असे मानले जाते. त्यांनीच बद्रीनाथला चार धामांपैकी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून पुन्हा स्थापित केले.
६. काही इतिहासकारांना असे वाटते की, हे मंदिर सुरुवातीला बौद्ध विहार होते, ज्याला नंतर आदि शंकराचार्यांनी हिंदू मंदिरात रूपांतरित केले.
७. दरवर्षी केवळ सहा महिने (एप्रिलच्या शेवटी ते नोव्हेंबरच्या सुरुवातीपर्यंत) भाविकांसाठी खुले असते, कारण हिवाळ्यात येथे प्रचंड बर्फवृष्टी  होते 
८. पंच बद्री: बद्रीनाथ हे केवळ एक धाम नाही, तर याव्यतिरिक्त पंच बद्री म्हणून ओळखले जाणारे आणखी चार बद्री मंदिरं आहेत, ज्यात योगध्यान बद्री, भविष्य बद्री, वृद्ध बद्री आणि आदि बद्री यांचा समावेश होतो.
९. सध्याचे बद्रीनाथ मंदिर भव्य आणि आकर्षक आहे. मंदिराच्या सभामंडपावर डेरेदार कळस आणि गाभाऱ्यावर पॅगोडा पद्धतीचे सोन्याच्या पत्र्याने मढविलेले शिखर आहे. 

 



सिंहद्वाराच्या मध्यभागी एक मोठी घंटा लटकलेली आहे.


बद्रीनाथ धाम आणि केदारनाथ धामचा परस्पर संबंध : 

पूर्वकाळात शिवभूमी: काही पौराणिक कथांनुसार, बद्रीनाथ हे स्थान पूर्वी भगवान शिव आणि देवी पार्वतीचे निवासस्थान होते. भगवान विष्णूंना हे स्थान खूप आवडल्याने त्यांनी बालकाचे रूप घेऊन या ठिकाणी रडायला सुरुवात केली. पार्वती मातेच्या विनंतीवरून भगवान शंकरांनी हे स्थान त्या बालकाला (जो प्रत्यक्षात विष्णू होते) दिले आणि स्वतः केदारनाथला निघून गेले.


सिंहद्वार


बद्री वृक्षाशी संबंध: 

एका पौराणिक कथेनुसार, भगवान विष्णू तपश्चर्या करत असताना, त्यांना तीव्र उष्णता आणि हिमवृष्टीपासून वाचवण्यासाठी देवी लक्ष्मीने 'बद्री' (बोरीचे झाड) चे रूप घेतले. लक्ष्मीच्या या भक्तीमुळे प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी या जागेला 'बद्रीनाथ' असे नाव दिले, म्हणजे "बद्री वृक्षाचे स्वामी". या भागात पूर्वी मोठ्या प्रमाणात बोरीची (बद्री) वने होती, त्यामुळेही हे नाव पडले असे मानले जाते.


अलकनंदा नदीवरील पूल 

धार्मिक महत्त्व:

  • चार धाम पैकी एक: हे भारतातील चार प्रमुख धाम (बद्रीनाथ, रामेश्वरम, द्वारका, पुरी) पैकी एक आहे, ज्यामुळे यात्रेकरूंसाठी याचे खूप महत्त्व आहे.
  • पिंडदान: बद्रीनाथ जवळील ब्रह्मकपाल हा एक पवित्र खडक आहे, जिथे पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पिंडदानाचे विधी केले जातात.
  • तप्तकुंड: मंदिराजवळ गरम पाण्याचे झरे आहेत, ज्याला 'तप्तकुंड' म्हणतात. या थंड प्रदेशात या गरम पाण्यात स्नान करणे हे एक अद्भुत अनुभव असतो आणि ते पवित्र मानले जाते.


मंदिराचा बाह्य भाग आकर्षक आणि चमकदार रंगांनी रंगवलेला आहे 


कपाट उघडणे आणि बंद करणे:

बद्रीनाथ मंदिराचे कपाट सहसा एप्रिल-मे महिन्यात अक्षय्य तृतीयेच्या दिवशी उघडले जातात. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भाऊबीजेला थंडी आणि बर्फवृष्टीमुळे मंदिर बंद केले जाते. या काळात भगवान बद्रीनाथांची उत्सव मूर्ती जोशीमठ येथील नरसिंह मंदिरात आणली जाते, जिथे त्यांची पूजा केली जाते.


 नर-नारायण पर्वत ही दोन पर्वतांची जोडी आहे, जी उत्तराखंडमधील बद्रीनाथ येथे आहे.ही दोन पर्वते भगवान विष्णूचे दोन रूप मानली जातात



बद्रीनाथला पोहोचण्याचे मार्ग : 

बद्रीनाथला पोहोचण्यासाठी हरिद्वार किंवा ऋषिकेश हे मुख्य ठिकाणे आहेत. हरिद्वार आणि ऋषिकेश येथून बद्रीनाथसाठी बस आणि टॅक्सी सेवा उपलब्ध आहे. ऋषिकेश ते बद्रीनाथ हे अंतर सुमारे २९५ किमी आहे आणि प्रवासाला १०-१२ तास लागतात.वाटेत देवप्रयाग, रुद्रप्रयाग, कर्णप्रयाग आणि जोशीमठ यांसारख्या सुंदर ठिकाणांवरून प्रवास होतो. जोशीमठ हे बद्रीनाथपासून सुमारे ५० किमी अंतरावर आहे आणि येथून स्थानिक जीप किंवा टॅक्सीने बद्रीनाथला जाता येते.




बद्रीनाथ धामला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ :

उन्हाळा ऋतू, किंवा मे ते जुलै महिने बद्रीनाथ मंदिराला भेट देण्यासाठी आदर्श काळ आहे. पावसाळ्यात भूस्खलन आणि रस्ते अडथळे येत असले तरी, तुम्ही बद्रीनाथ धामला भेट देऊ शकता.





मोक्षप्राप्ती: 
अशी श्रद्धा आहे की बद्रीनाथचे दर्शन घेतल्याने भक्ताला जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो. म्हणूनच या जागेला "भूलोकावरील वैकुंठ" असेही म्हटले जाते. मंदिरातील एक विशेष गोष्ट म्हणजे येथील अखंड ज्योत. मंदिर सहा महिने बंद असतानाही हा दिवा सतत तेवत असतो असे मानले जाते. या दिव्यासाठी वापरले जाणारे तेल टिहरीच्या राजवाड्यातील महिला तयार करतात.




पाऊल ट्रेकर्स 

शंख वाजवण्याची परंपरा नाही: 

बद्रीनाथ मंदिरात शंख वाजवला जात नाही, यामागे काही पौराणिक कथा आणि मान्यता आहेत. एका कथेनुसार, भगवान विष्णूंनी एकदा शंखचूर्ण नावाच्या राक्षसाचा वध केला होता, ज्यामुळे येथे शंख वाजवला जात नाही.



पुजारी (रावल): 

मंदिराचे मुख्य पुजारी दक्षिण भारतातील केरळमधील नंबूदिरी ब्राह्मण वंशाचे असतात, ज्यांना "रावल" असे संबोधले जाते. ही परंपरा आदि शंकराचार्यांनी सुरू केली असे मानले जाते.



पाऊल ट्रेकर्स 





नीम करोली बाबा कुटीया 



हे मंदिर समुद्रसपाटीपासून सुमारे ३,१३३ मीटर (१०,२७९ फूट) उंचीवर आहे.



माना गावातील भित्तीचित्रांची शैली, इतर ठिकाणांपेक्षा वेगळी आहे. 
ती, त्या भागातील स्थानिक कलाकारांनी विकसित केलेली आहे.






Monday, March 31, 2025

जोगेश्वरी लेणी - मुंबई


जोगेश्वरी लेणी -  मुंबई

 मुंबई म्हणजे स्वप्नांचे शहर ! ह्या शहरात लोकं आपली स्वप्न पूर्ण करण्याच्या मागे पळत असतात. पण अश्या गजबजलेल्या शहरात इतिहासाची साक्ष देणारे अनेक प्राचीन पुरावे अस्तित्वात आहेत हे तुम्हाला माहिती आहे का ? मुंबईच्या मायानगरीत १५०० वर्ष जुना प्राचीन इतिहासाचा खजिना आजही अस्तित्वात आहे. 

मी आज लिहीत आहे ते मुंबईतील एका प्राचीन लेण्याबद्दल ! मुंबई मध्ये मानवी वस्तीमधेच दगडात कोरलेली एक अद्भुत हिंदू लेणी आहे. जोगेश्वरीच्या मध्यभागी असलेल्या ह्या लेणीला पूर्वी आंबोली लेणी म्हणायचे कारण पूर्वी हे लेणे आंबोली गावाच्या हद्दीत आहे असा उल्लेख मुंबई गॅझेटियर मध्ये आहे . आता तिला जोगेश्वरी लेणी म्हणून ओळखतात. 

ही  लेणी पाहणे हा एक अद्भुत अनुभव का आहे ह्याचे कारण असे की  गुहेच्या आजूबाजूला अत्यंत दाट अशी मानवी वस्ती आहे.  लेण्यांच्या काही अंतरावरच गर्दी आणि दैनंदिन जीवन सुरु आहे, आणि तरीही त्यामधेच हे प्रचंड लेणे कोरले आहे. 

अगदी दोन्ही बाजुंनी मानवी वस्ती आणि दगडांनी वेढलेल्या रस्त्याने आत जात असताना तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला एक छोटेसे दार आणि पायऱ्या उतरत लेणीत जावे लागते. आणि जसे तुम्ही पहिल्या द्वार मंडपात प्रवेश करता तेव्हा तुम्हाला त्या लेण्याच्या आकार केवढा आहे ह्याची काहीच कल्पना येत नाही. पण जसे द्वारमंडप ओलांडून तुम्ही मुख्यमंडपात जात तेव्हा त्याची भव्यता तुम्हाला विचार करायला लावते. 

मग पुनःपुन्हा तोच प्रश्न तुमच्या मनात येतो की  एवढा मोठा कठीण दगड खोदून कशी बरी  ही  लेणी कोरली असेल ? काटकोन त्रिकोणाचा अभ्यास त्यावेळच्या लोकांना कसा काय माहिती असेल ? तेव्हाच्या काळात चैन पुली , टॉवर क्रेन आणि अद्यावत उपकरणे नसताना पण एवढ्या उंचीचा सभामंडप कसा खोदून तयार केला असेल ? मग आपल्या मनात येतो तो त्या जागेचा इतिहास !



दर्शनी द्वारावर सुंदर कोरीव काम आहे




इतिहास : 

लेण्याच्या सुरुवातीला एक माहिती फलक आहे. त्यामधील माहिती आणि आंतरजालावरील माहिती मी खाली देत आहे 
  • ह्या लेण्या सहाव्या शतकात बांधल्या गेल्या आहेत (इ.स. ५२० ते इ.स. ५५०)
  • जोगेश्वरी लेणी ही एलिफन्टा (घारापुरी) आणि वेळूर येथील लेणी क्रमांक २९ जिचे नाव धुमार लेणी आहे त्यांच्याशी मिळतीजुळती आहे 
  • या लेण्या महायान बौद्ध संस्थापकांच्या शेवटच्या टप्प्यातील आणि वैदिक धर्माच्या पुनर्स्थापनेतील आहेत.
  • सहाव्या शतकात जोगेश्वरी लेण्या बांधण्यापूर्वी, वाकाटक राजवंशाच्या काळात इ.स.पूर्व पहिल्या आणि दुसऱ्या शतकात बौद्ध मंदिरांची इमारत बांधली गेली होती. त्याच प्रदेशातील हिंदू समुदायाने बौद्ध बांधकामांपासून प्रेरणा घेतली आणि अशा प्रकारे जोेश्वरी मंदिर लेण्या अस्तित्वात आल्या.  जोगेश्वरी लेणी ही बौद्ध आणि वैदिक धार्मिक लेण्यांचा एक सुंदर संगम आहे असे मानतात 
  • वाकाटक राजा हरिषेण च्या मृत्यूनंतर, ज्याने अजिंठा लेण्यांमध्ये बरेच बांधकाम केले होते, अजिंठा येथील अनेक कारागीर त्यांचे कौशल्य इतरत्र वापरण्याच्या शोधात हा परिसर सोडून गेले. असे मानले जाते की काही जण पश्चिमेकडील आधुनिक मध्य प्रदेशातील हिंदू कलचुरी राज्यात गेले असतील आणि आज जोगेश्वरी लेण्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुहांवर काम करू लागले असतील.
  • इतिहासकार आणि विद्वान वॉल्टर स्पिंक यांच्या मते, जोगेश्वरी हे भारतातील सर्वात जुने प्रमुख गुहा मंदिर आहे आणि (एकूण लांबीच्या बाबतीत) "सर्वात मोठे" आहे
  • १९०९ मध्ये ब्रिटिश सरकारने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अंतर्गत या लेण्यांना वारसा स्थळ म्हणून घोषित केले. नंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने ते राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक म्हणून घोषित केले.


जोगेश्वरी लेणी -  माहिती फलक


लेण्यांची संरचना : 


१. लेण्यांच्या प्रवेशद्वारावर पर्यटकांना मुख्य दालनात जाण्यासाठी पायऱ्या आहेत. (पश्चिम बाजू)
 

पश्चिमेकडील प्रवेशिका 


२. मग आपणास एक द्वारमंडप दिसतो त्याला एक दरवाजा आहे आणि त्या द्वारमंडपावर पुसट  होत चाललेल्या मुर्त्या आहेत. मुर्त्यांची आकार समजण्या पलीकडे गेला आहे 


पश्चिमेकडील प्रवेशद्वार - ह्यांनंतर द्वारमंडप येतो 


३. मुख्य मंडप : येथे पाय ठेवल्यावर आपणास लेण्याची भव्यता दिसते . हा २० स्तंभांवर आधारित विशाल सभामंडप आहे . या मंडपाच्या मध्यभागी ‘सर्वतोभद्र’ गर्भगृह असून, एका उंच पीठावर मधोमध शिवलिंग असावे. सर्वतोभद्र हे हिंदू मंदिर वास्तुकलेचा एक प्रकार आहे, ज्यामध्ये गर्भगृहाच्या प्रत्येक बाजूला एक दरवाजा आहे. ही मंदिरे सामान्यतः सर्व बाजूंनी सममितीय असायची, आतील गर्भगृह एका खांबाने वेढलेले असते, ज्याचा वापर परिक्रमा करण्यासाठी केला जात असे. संस्कृतमधून, याचा अर्थ "सर्व बाजूंनी शुभ." सध्या मध्यवर्ती गाभारा जोगेश्वरी देवीला समर्पित आहे. गुहेत जोगेश्वरी (कुलदेवी) देवींच्या पावलांचे ठसे देखील आहेत.  जोगेश्वरी देवीवरून ह्या परिसराला जोगेश्वरी नाव पडले आहे. 



जोगेश्वरी देवीचे मंदिर 




४. मुख्य मंडपाच्या बाजूलाच व्हरांडा आहे जो विस्तीर्ण आणि स्वच्छ आहे. त्याच्या बाजूलाच अनेक रिकामी खोल्या आहेत. खडकांची झीज मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे त्यांची अवस्था खराब झालेली आहे.  लेण्यात सहाव्या शतकातील संस्कृत भाषेतील एक भग्न शिलालेख आहे. (आमच्या नजरेतून सुटून गेला आहे )  .त्यातील एका लेण्यात शिवलिंग आहे. आणि बाजूला हनुमान आणि दत्तगुरु मंदिर देखील आहे. 




५. मुख्यमंडपातून बाहेर आल्यावर तुम्हाला ह्या लेण्याच्या प्राचीन असल्याचे पुरावे देणाऱ्या मूर्ती दिसतात.  
  • दर्शनी द्वारावर सुंदर कोरीव काम आहे. मध्यभागी लकुलीश त्याच्या कुशिका, गर्ग, मित्र आणि कौरुष्य या चार शिष्यांसह दर्शविले आहेत. लिंग पुराणात वर्णन केलेल्या परंपरेनुसार, लकुलीश हा शिवाचा २८वा आणि शेवटचा अवतार आणि योग पद्धतीचा प्रवर्तक मानला जातो.या परंपरेत लकुलिशाचे चार शिष्य होते: कौरुष्य, गर्गा, मित्र आणि कुशिका. स्कंद पुराणातील अवंती विभागात वर्णन केलेल्या दुसऱ्या परंपरेनुसार, लकुलीश आणि त्याच्या चार शिष्यांनी महाकालवन येथे एक लिंग स्थापित केले, जे त्या वेळी कायावरोहनेश्वर म्हणून ओळखले जात असे.
  • त्यांच्या डाव्या बाजूला ‘कल्याणसुंदर मूर्ती’, तर उजवीकडे शिवपार्वती ‘सारीपाट’ खेळताना दर्शविलेले आहेत. कल्याणसुंदर मूर्ती म्हणजे शिव-पार्वतीच्या विवाहाचे (कल्याण) दर्शवणारी मूर्ती, जिथे शिव आणि पार्वती एकत्र उभे असतात, आणि ब्रह्मा विवाह सोहळा (कल्याण) पार पाडताना दाखवले जातात.
  • दोन्ही बाजूंना द्वारपाल (प्रतीहार) कोरलेले आपणास दिसतात .

द्वारपाल (प्रतीहार) आणि त्यांचे सेवक 



द्वारपाल (प्रतीहार) आणि त्यांचे सेवक 



मध्यभागी लकुलीश त्याच्या कुशिका, गर्ग, मित्र आणि कौरुष्य



कल्याणसुंदर मूर्ती म्हणजे शिव-पार्वतीच्या विवाहाचे (कल्याण) दर्शवणारी मूर्ती, जिथे शिव आणि पार्वती एकत्र उभे असतात, आणि ब्रह्मा विवाह सोहळा (कल्याण) पार पाडताना दाखवले जातात.






उजवीकडे शिवपार्वती ‘सारीपाट’ खेळताना - इथे तुम्हाला शंकर पार्वती नंदी गणपती दिसतील 



६. नंतर एक मोठे अंगण आहे जे चारी बाजूने भिंतींनी वेढलेले आहे . तिथून पुढे पश्चिमेकडील मंडप आहे आणि तिथे एक शेंदूर लावालेली गणेशाची मूर्ती आहे. आणि पूर्व प्रवेशद्वाराकडे जाणाऱ्या सुंदर कोरीव पायऱ्या आहेत. 


अंगणात उभे राहून दिसणारी दुमजली लेणी 


७.  पूर्वेकडील प्रवेशद्वाराच्या  दर्शनी भागावर रावणानुग्रह मूर्ती’ आहे. येथे  सप्तमातृकांच्या प्रतिमांचे अवशेष पाहायला मिळतात.   (वाचल्यावर कळले कि हे ही आमच्या नजरेतून सुटून गेला आहे. बहुदा परत जावे लागेल शोधायला ! ) 





गणपती बाप्पा मोरया ! 




पाऊल ट्रेकर्स 



पूर्व प्रवेशद्वाराकडे जाणाऱ्या सुंदर कोरीव पायऱ्या

काही तथ्ये : 

  • जोगेश्वरी गुहांमध्ये येथील सुंदर कोरीवकाम इतिहास आणि स्थापत्यकलेमध्ये रस असलेल्या सर्वांसाठी पाहण्यासारखे आहे. या गुहेतून चालत गेल्यावरच या गुहेतील प्रचंड उत्खननाचे निरीक्षण करता येते. पूर्वेकडील प्रवेशद्वारापासून पश्चिमेकडील प्रवेशद्वारापर्यंत, अंगणासह  अंतर २५० फूट सरळ रेषेत आहे जे वेरूळ येथील कैलास वगळता इतर कोणत्याही ज्ञात हिंदू लेण्यापेक्षा पेक्षा जास्त आहे.

  •  भारतातील संरक्षित स्मारकांमध्ये सामान्यतः १०० मीटरचा बहिष्कार क्षेत्र असतो, ज्यामुळे या संरचनेवर कोणतेही अतिक्रमण होऊ शकत नाही. वर्षानुवर्षे दुर्लक्ष व मानवी वस्तीचे अतिक्रमण यांमुळे या लेण्याची बरीच पडझड झालेली दिसते.  तथापि, आज या लेण्यांचे वास्तव वैभवशाली नाही. शहरी अतिक्रमणांनी वेढलेले हे ठिकाणआपणास थोडेफार अस्वच्छ वाटते. 

  •  गुहा सामान्यतः त्यांच्या गूढ रचनेमुळे भीतीदायक वाटतात पण ह्या लेण्यात खूप शांतता आहे . इथे अनके वेळा शाळकरी किंवा महाविद्यालयीन मुले अभ्यास करताना देखील दिसतात 

  • इथे महाशिवरात्री आणि नवरात्री उत्साहात साजरी केली जाते. 

( ०५. ११. २०२१ )



दर्शनी द्वारावर सुंदर कोरीव काम असलेली पट्टीका



झरोका आणि त्यावरील पुसट  होत असलेले कोरीव काम 



झरोका आणि त्यावरही अस्पष्ट शिल्प आहे 

Wednesday, November 2, 2022

गिल्बर्ट हिल - अंधेरी पश्चिम , मुंबई

 गिल्बर्ट हिल

मुंबईच्या अंधेरी  भागात एक खूप जुनी टेकडी आहे. अगदी मानवी जीवनाच्या आधी निर्मित झालेली !  वाचून आश्चर्य वाटले ना ? पण जवळपास साडेसहा कोटी वर्ष  (66 Million year Ago) ज्वालामुखीच्या लाव्हापासून निर्मित अशी एक टेकडी मुंबईच्या अंधेरी भागात आहे तिचे नाव आहे "गिल्बर्ट हिल" !  "गिल्बर्ट हिल"   इतिहासाचा एक जिवंत साक्षीदार आहे. पृथ्वीवर माणसाचा जन्म २ कोटी वर्षापूर्वी झाला असे मानले तर  मानवी उत्क्रांतीच्या आधी ह्या "गिल्बर्ट हिल" ची निर्मिती झाली आहे. 


ह्या "गिल्बर्ट हिल"  चे काही महत्वाचे आणि आश्चर्यकारक तत्थे  खाली देत आहे 
  • स्थान : अंधेरी पश्चिम , मुंबई 
  • उंची : ६० मीटर ( २०० फूट) 
  • वय : जवळपास साडेसहा कोटी वर्ष
  • दगड : कॉलम्नार बेसॉल्ट 
  • कालखंड : मेझॉइक कालखंड  (३) - सुमारे 252 ते 66 दशलक्ष वर्षांपूर्वी
  • निर्मिती :  ज्वालामुखीच्या उत्पातातून 
  • "गिल्बर्ट हिल निर्मिती ही  हिमालयाच्या निर्मिती आधीची आहे ! म्हणजे हिमालयाचा जन्म होण्या आधीच ह्या टेकडीचे अस्तित्व मुंबई मध्ये होते. 
  • १९५२ मध्ये फॉरेस्ट ऍक्ट अंतर्गत ह्या टेकडीला राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केले आहे 
  • भूगर्भशास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयत्नांमुळे २००७ साली ह्या टेकडीला द्वितीय श्रेणीचा जागतिक वारसाचा दर्जा मिळाला आहे 
  • सरळसोट कॉलमच्या स्वरूपातली ही टेकडी हे  स्तंभीय कॉलम्नर बेसॉल्ट (व्हर्टिकल कॉलोमनर  बेसाल्ट) चे  एक उत्तम उदाहरण आहे 


गिल्बर्ट हिल निर्मिती मेसोझोइक युगात (३) झाली. स्तंभीय कॉलम्नर बेसॉल्ट (व्हर्टिकल कॉलोमनर  बेसाल्ट)पासून बनलेल्या जगात फक्त तीन टेकड्या असून, गिल्बर्ट हिल त्यापैकी एक आहे. 
कॉलम्नर बेसॉल्टची ही रचना फारच दुर्मिळ अशी मानली जाते. अश्या रचनेच्या जगातील तीन टेकड्या खालील प्रमाणे 
  • "गिल्बर्ट हिल" - अंधेरी मुंबई 
  • डेविल्स टॉवर , व्योमिंग , अमेरिका (१) 
  • डेव्हिल्स पोस्टपाइल , कॅलिफोर्निया  , अमेरिका (२) 
गावदेवी माता आणि दुर्गादेवी माता मंदिर


गिल्बर्ट हिलचे आताचे स्वरूप : 

या टेकडीवर गावदेवी माता आणि दुर्गादेवी माता अशी दोन मंदिरे आहेत . समोर छोटे उद्यान आहे . 
मंदिराजवळ जाण्यास पायऱ्या केल्या आहेत. टेकडीच्या भोवताली उंच इमारतींचा  गराडा आहे. 
एक बाजूला मैदान असल्या कारणाने त्या बाजूने "गिल्बर्ट हिल" ची उंची आणि स्तंभीय कॉलम्नर बेसॉल्ट (व्हर्टिकल कॉलोमनर  बेसाल्ट)  स्वरूप नीट पाहता येते 
स्तंभीय म्हणजे कॉलम्नर बेसॉल्टच्या या विशिष्ट रचनेला लॅकॉलिथ असे म्हणतात. या लॅकॉलिथचा शोध लावणाऱ्या अमेरिकन भूवैकज्ञानिक ग्रोव्ह कार्ल गिल्बर्ट यांच्या नावावरून या टेकडीला आज गिल्बर्ट हिल म्हणून ओळखले जाते, असा एक मतप्रवाह आहे. तर दुसऱ्या प्रवाहाच्या मते,  तत्कालिन विभागीय इंग्रज अधिकारी असलेल्या गिल्बर्ट नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याच्या नावावरून हे नाव पडले आहे. 


गिल्बर्ट हिल


गिल्बर्ट हिलची निर्मिती : 
मेसोझोइक युगात लाव्हारसाच्या उद्रेकातून अनेक ठिकाणी अशा लहान-मोठ्या टेकड्या, डोंगर तयार झाले आहेत.  अनेक वेळा बेसॉल्टचे थर  जेव्हा तयार होतात तेव्हा आडव्या स्वरूपात एकावर एक साचतात आणि एक मजबूत बेसॉल्टचा डोंगर तयार होतो पण अश्या प्रक्रियेला गिल्बर्ट हिल अपवाद आहे . क्रिटेशस युगाच्या अंतकाळी, म्हणजेच साधारण साडेसहा कोटी वर्षांपूर्वी भारतीय उपखंड आफ्रिकेजवळ म्हणजे आताच्या हिंदीमहासागरात होता. हा भूभाग हळूहळू ईशान्येला सरकत होता. याच काळात काही भूगर्भीय हालचालींमुळे ज्वालामुखींचे उद्रेक होऊ लागले. साधारण तीसेक हजार वर्षे हा अग्निकल्लोळ सुरू होता. लाव्हा विविधरूपांनी अवतरत होता. यातूनच दख्खनच्या पठाराचा , मुंबईचा आणि गिल्बर्ट हिलचा  जन्म झाला. गिल्बर्ट हिलची हा एका मोठ्या भौगोलिक घटनेच्या इतिहासाचा साक्षीदार आहे . 

स्तंभीय कॉलम्नर बेसॉल्ट (व्हर्टिकल कॉलोमनर  बेसाल्ट)



मालाड स्टोन :

गिल्बर्ट हिलची माहिती वाचताना आतंरजालावरून  काही अजून माहिती नव्याने समजली. 
मुंबईपरिसरात अशाच प्रकारच्या ह्रायोलाइट, ट्रॅकाइटसारख्या अग्निजन्य खडकांच्या स्तंभीय रचनाही पाहायला मिळतात. यापैकी प्रमुख दोन ठिकाणे म्हणजे भाईंदरजवळील उत्तन डोंगरी आणि कांदिवली-मालाड परिसरातील बाणडोंगरी. उत्तन डोंगरी परिसरातील याच दगडाचा वापर १६व्या शतकात पोर्तुगीजांनी तोफांचे दगडी गोळे बनवण्यासाठी केला होता. असे तोफगोळे त्यांच्या वसई आणि गोवा या दोन्ही प्रांतात सापडले आहेत. तर बाणडोंगरीचा दगड मात्र वेगळ्या पोताचा असल्याने १९व्या-२०व्या शतकात 'मालाड स्टोन' म्हणून नावारूपाला आला. याच टेकडीतून खोदून काढलेल्या दगडातून १८६० ते १९३०च्या दरम्यान डेविड ससून लायब्ररी, वेस्टन रेल्वे बिल्डिंग अशा अनेक वारसा इमारतींची निर्मिती झाली. (*महाराष्ट्र टाइम्स संदर्भ : (टीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स | Updated: 19 Jun 2021)

१) डेविल्स टॉवर , व्योमिंग , अमेरिका 

निर्मिती :  ट्रायसिक कालावधी  (Triassic Period) : २५२ ते २०१ दशलक्ष वर्षांपूर्वी 
डेव्हिल्स टॉवर हे  " बेल्ले फोरचे"  (Belle Fourche) नदीच्या खोऱ्या पासून  १२६७ फूट (३८६ मीटर) उंच आहे. 
त्याच्या शिखराची समुद्रसपाटीपासून ५११२ फूट (१५५८ मीटर) उंची आहे.
२० पेक्षा जास्त नेटिव्ह अमेरिकन म्हणजेच  जास्त मूळ अमेरिकन जमातींसाठी  ते एक पवित्र स्थान, 
या टॉवरला बेअर लॉज म्हणून देखील ओळखले जाते.

डेविल्स टॉवर , व्योमिंग , अमेरिका 


२) डेव्हिल्स पोस्टपाइल , कॅलिफोर्निया  , अमेरिका 

निर्मिती :  सुमारे 1,00,000 वर्षांपूर्वी, प्युमिस फ्लॅटच्या उत्तरेला ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि सॅन जोक्विन नदीच्या मिडल फोर्कची  दरी वाहणाऱ्या बेसल्टिक लावाने भरली. 
अमेरिका देशाने डेविल्स टॉवर आणि  डेव्हिल्स पोस्टपाइल असणाऱ्या भागाला राष्ट्रीय उद्यान घोषित करून ते संसरक्षित केले आहे. भारतात मात्र थोडी उदासिनता असलेले चित्र दिसते 

डेव्हिल्स पोस्टपाइल , कॅलिफोर्निया  , अमेरिका 



३) मेसोझोइक युग म्हणजे काय ? 

मेसोझोइक युगला  सरपटणाऱ्या प्राण्यांचे युग आणि कॉनिफर्सचे युग देखील म्हटले जाते.  हा पृथ्वीच्या भूगर्भशास्त्रीय इतिहासाचा दुसरा ते शेवटचा युग आहे, जो सुमारे २५२  ते ६६ दशलक्ष वर्षांपूर्वीचा आहे आणि त्यात ट्रायसिक, जुरासिक आणि क्रेटेशियस कालावधीचा समावेश आहे.
मेसोझोइक (Mesozoic)
  • ट्रायसिक कालावधी ( The Triassic Period) :   २५२ ते २०१ दशलक्ष वर्षांपूर्वी.
  • जुरासिक कालावधी  ( The Jurassic Period ) : २०१ ते १४५ दशलक्ष वर्षांपूर्वी.
  • क्रेटेशियस कालावधी (  The Cretaceous Period ) : १४५ ते ६६ दशलक्ष वर्षांपूर्वी.


पाऊल ट्रेकर्स : नरेंद्र , अमर , धवल , जुही, अनिकेत , राजेश  





Friday, April 10, 2020

गोष्ट एका पाहुणचाराची - म्हाडंलाईवाडी , कोल्हापूर - १२. १२ . २०१९

गोष्ट एका पाहुणचाराची - १२. १२ . २०१९ 

पहिल्या रात्रीचे जेवण - म्हाडंलाईवाडी

पन्हाळा  ते म्हाडंलाईवाडी (१८ किलोमीटर) - 

पन्हाळा ते पावनखिंड ट्रेकचा पाहिला दिवस होता.  त्यादिवशी किमान  २० किलोमीटर चालून आंबेवाडीमध्ये मुक्काम  करायचा असे ठरले होते.  रणरणत्या उन्हात म्हसाई पठार पार करून आम्ही थोड्या  सावलीत जेवण केल.  हनुमान  सरांनी ४० ठेपले  आणले होते.  त्यावरच ताव मारून पेटपूजा केली.  पुढे चालणे थांबवले  नाही. चालत चालत संध्याकाळी चार वाजले. आता मात्र अंगातील  त्राण संपले होते.  खोतवाडीमध्ये  आल्याबरोबर (१५ किलोमीटर पार) संदीपची अवस्था  पुढे  काही  मिनिटे चालण्यापुरती राहिली होती.  असे असताना  देखील  त्याला धीर देत देत आंबेवाडी झाली नाही तरी करपेवाडीला तरी पोहोचायचे असा ठरला.  पण सूर्यास्त झाला आणि  काळोख  दाटू लागला.  आम्ही रस्ता सोडून मळ्यातून चालू  लागतो. वाट सोडून जातोय हे समजल्यावर अजूनच  चीड  चीड होत होती.  अंधार पडू लागल्यावर पुढे  जाणेही थोडं जिकरीचे वाटू लागले.  मग धवल, अमरेश आणि अभिनवने मिळून ठरवले की आपण येईल  त्या वाडीत मुक्काम करायचा.  समोरच एक वाडी  दिसली. वाडीचे  नावं होते  म्हाडंलाईवाडी ! 
म्हाडंलाईवाडीमधील गोंडस मुलं 

म्हाडंलाईवाडी - 

काळोख  दाटला होता. दुरूनच घराबाहेरचे दिवे दिसू लागल्यावर थोड बरे वाटू लागले होते.  आमची चाहूल लागल्यावर  दुरूनच  कुत्री  भुंकायला लागली.  असले स्वागत अपेक्षित  होतेच. एका मोठ्या घराच्या कडेकडेने चालत आम्ही वाडीत आलो.  आठ नऊ घरांची  सुखवस्तू  वाडी. वाडी मध्ये एक  मंदिर, आजूबाजूला  माळरान,  शेती आणि एवढ्या उंचावर डिसेंबर मध्ये ही मुबलक पाणी असल्याने आजच्या  वस्ती साठी उत्तम जागा वाटली. एका  घराच्या  ओसरीवर सर्वांनी  आपल्या अवजड बॅग्स टाकल्या आणि तसेच बॅग्स  वर लोटून  गेलो. तेवढ्यात लहान मुलं आमच्या  भोवती जमा  झाली.  अमर  आणि महेशने चॉकलेट दिल्याने सर्व खुश झाली.  वाडीला ट्रेकर्स लोकांची  सवय असावी.  गावातील  काही प्रौढ व्यक्तींनी आमची विचारपूस केली.  त्यांच्या  चेहऱ्यावरचा आनंद  आणि आमच्या प्रतिचा आदर पाहिला  की मन सुखावत होते.  सचिनने राहण्यासाठी चौकशी केली. तेथील  गावकऱ्यांनी मोठ्या  दिलाने मंदिरामध्ये  रहा असे सांगितले.  एका शाळकरी मुलाने मंदिराचे  दरवाजे  खुले करून दिले आणि आम्ही अवाक झालो ! 

शिवमंदिर - म्हाडंलाईवाडी 

शिवमंदिर -

मंदिर  खुले केल्यावर  अवाक  होण्याचे  कारण त्या  मंदिरात फक्त शिवरायांची मूर्ती होती. अविश्रांत परिश्रम घेऊन आपले ध्येय धोरण सिद्धीस नेण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपले सर्व आयुष्य वेचले. अश्या युगपुरुषाचे दर्शन  घेतले. वास्तव्यही अश्या पावन मंदिरात व्हावे या सारखे भाग्य नाही.  मंदिर साधे सुधे होते . गाव जेवणाची काही भांडी आणि मंदिर अजून सुसज्ज करण्यासाठी लागणारे काही सामान मंदिरात होते. सर्वांनी आपल्या  बॅग्स  नीट लावून थोडी विश्रांती  घेतली. वाडीतील लोकांच्या आत्मीयतेनमुळे रहाणायचा प्रश्न सुटलेला  होता.  आता पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सचिन मंदिरा बाहेर पडला.  

 पाऊल ट्रेकर्स त्या २ शाळकरी मुलांसोबत 

मार्गशीर्षाचा गुरुवार आणि चहा  - 

तो दिवस मार्गशीर्षाचा गुरुवार होता.  वाडीतील महिलांची पोथी वाचण्याची वेळ झाली  होती.  एक काका म्हणाले पोथी  वाचून झाली की तुमची सर्व व्यवस्था समोरच्या  घरात  होईल.  त्या घराकडे बोट दाखवून  ते पुढे निघून गेले.  सचिन ने त्या घरी सांगून चहा आणि जेवणाचा सर्व बंदोबस्त  केला.  मंदिरात गप्पा मारतानाच २ शाळकरी  मुलं चहाचे  २ ट्रे घेऊन  आली.  मुलं आमच्या कडे कुतूहलानं पहात होती  आणि आम्ही चहा कडे ! मुलं खूप सुजाण आणि लाजरी  बुजरी  वाटली.  त्यांसोबत गप्पा मारता मारता चहा कधी  संपली  हे समाजाला नाही. त्यांनतर  गुरुवारचा प्रसाद मुलांनी  आणला. तो इतका छान होता की आम्ही परत परत मागवून  खाल्ला. खाण्यासाठी  तसें आम्ही निर्भीड माणसे.  लाज नावाची चीझ आमच्यात खाण्याच्याबाबीत तरी नाही. बाहेर  थंडी  वाढत  चालली  होती.  आणीबाणीच्या वेळेस वाडी मिळाली नाही तर आजूबाजूची लाकडे गोळा करून चुलीवर जेवण बनवायचं असे ठरले होते.  पण पहिल्या दिवशी रात्री जेवणाची  सोय एका काकूंनी केली म्हणून आम्ही आणलेले  सर्व सामान विग्नेशा आणि वैशाली ह्यांनी त्या काकूंना  दिले. पण खास गावचा भात आणि त्यांच्या पद्धतीत जेवण करा  असा आम्ही आग्रह  धरला.  

रात्रीचे जेवणं

रात्रीचे जेवणं - 

सर्व हात पाय धुवून काकूंच्या  घरी पोहोचालो.  शेणानी सारवलेल्या जमिनीवर बसून त्यांकडे  गप्पा  मारत  होतो.  आत मराठी मालिका चालू होती.  काकूंच्या  घरातील महिलामंडळींची लगबग सुरु  होती.  आम्ही एकूण ११ जण होतो.  आणि अचानक  समोर  जेवणाचं ताट आले.  आम्ही लगेच  ताव  मारला.जेवणं तर अतिशय चविष्ट झाले होते.   कधी नव्हे तर त्या दिवशी ३ वेळा भात घेऊन संपवला. काकूंचे आणि घरातली सर्व मंडळींचे  आम्ही आभार मानले. अजून एक उल्लेख  करण्यासारखी गोष्ट  म्हणजे ते सर्व कुटुंब उपवास  असल्याने  आमच्यानंतर जेवलं. ह्या गोष्टी खूपच भावल्या.  त्यांच्याकडून आदरातिथ्य शिकण्यासारखे होते. त्या दिवशी आम्हाला लगेचच  झोप लागली.  पहाटे वाडी मधून लवकर  निघावे  लागणार होते   .
पंगत 



पाहुणचाराचा अनुभव  -

सह्याद्रीच्या पाहुणचाराला तोडच नाही.  कुठेही जा,  सह्याद्री जसा तुमची काळजी घेतो तशीच  सह्याद्रीच्या  कुशीत  राहणारी  माणसेही तुमची काळजी  घेतात. आपापल्या परीने ते तुमची  मायेने विचारपूस करतात.  काही ना काही तुम्हाला देत असतात. कधी चहा.. कधी कांदेपोहे.. कधी अस्सल गावातील जेवण ते देऊ करतात.  त्यामागे त्यांची काही अपेक्षा नसतें.  त्यांना त्याचा मोबदला दिला तर कधी घेतात तर कधी  घेतही नाही. त्यांचे अंगण ते आपल्यासाठी खुलं करतात.  कधी घरात तर कधी मंदिरात आपली सोय करतात. तुमची सरबराई करणायचा प्रयत्न ते करतात.  आम्ही दिलेले सामानही त्या काकू  सकाळी  आम्हाला परत देत होत्या.  "तुम्हाला  पुढच्या  प्रवासाला  लागेल" असे त्या मायेने  म्हणाल्या.  अशी वाक्य त्यांच्या मनाच्या श्रीमंतीची जाणीव आपल्याला करून देत असतात. गावातील लोकांचं जीवन  साधे सुधे असतें. त्यांचा साधेपणा आणि त्यांच्या मनाची श्रीमंती तुमचं मन लगेच जिंकून  घेते.  पुढील प्रवासासाठी जेव्हा  ते "जपून जा " असे म्हणतात तेव्हा पाहुणेपणाची भावना गळून पडते.  ट्रेक करताना असे अनुभव आम्हाला  माणूस  म्हणून प्रगल्भ  करत असतात.  


शिवाजी महाराज 

सेल्फी टाइम 

पावनखिंडीकडे जाताना 


फोटो साभार - विग्नेशा पटेल आणि सचिन लांडे 

लेखन - 
नरेंद्र रविंद्रनाथ  लाखण.  



बद्रीनाथाचे दर्शन ! १७.०६. २०२४

 बद्रीनाथाचे दर्शन !   केदारनाथ धाम , तुंगनाथ महादेवमंदिर आणि  चंद्रशिला शिखर असा प्रवास करत आम्ही  उत्तराखंड राज्याच्या दोन धाम यात्रेच्या ...